देणाऱ्याचे हात हजारो...

ज्ञानेश्वरी- प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


भगवद्गीतेतील एक अत्यंत महत्त्वाचे सूत्र कोणते? तर कर्म करत राहणे; परंतु ते ‘मी’ केले हा अभिमान नसणे. अशा वृत्तीने जो जगतो, तो ईश्वराशी एकरूप होतो, तोच ईश्वर होतो. या सूत्राचे सविस्तर आणि सुंदर वर्णन करतात ज्ञानदेव! कसे ते पाहूया आता. अठराव्या अध्यायातील या अप्रतिम ओव्यांमधून.
श्रीकृष्ण अर्जुनाला वरील सूत्र सांगतात. ते समजावताना येतात माऊलींच्या या ओव्या!



‘हे पाहा, ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणे होते, किंवा सोन्याने सोने झाकले तर झाकणे होत नाही.’
पैं दर्पणातें दर्पणें। पाहिलिया, होय न पाहणें ।
सोनें झांकिलिया सुवर्णें। न झांके जेविं॥ (ओवी क्र. ११७५)
‘दिव्याने दिव्याला प्रकाशित केले तर ते प्रकाश न करणेच होय; त्याप्रमाणे माझ्याशी एकरूप होऊन कर्म केले ते कर्म करणे कसे म्हणावे?’ (ओवी क्र. ११७६)‘कर्म करीत असता मी कर्ता असा अभिमान नाहीसा झाला म्हणजे त्याचे सर्व करणे न करणेच होते.’
भक्ताने अभिमान टाकून दिला, म्हणून तो देवाशी एक झाला. कशाप्रमाणे? तर आरशाप्रमाणे! दोन आरसे एकमेकांसमोर ठेवले तर कोण कोणाला पाहणार? ते न पाहणेच होणार. यात आरशाप्रमाणे असलेला भक्त हे उदाहरण किती नेमकं! आरसा हा स्वच्छ असतो. तो तुम्हाला प्रतिबिंब दाखवतो. भक्ताच्या मनातील मोह, माया, अभिमान इ. सारे विकार नाहीसे झाले, म्हणजे तो स्वच्छ, लख्ख झाला आरशासारखा. तो देवाकडे पाहतो. पण देव वेगळा राहिला आहे का? नाही, भक्ताच्या भक्तीमुळे, साधनेमुळे तो आणि भक्त एक झाले. म्हणजे देव हाही दुसरा आरसा. मग एक आरसा दुसऱ्या आरशाला कुठून पाहणार? हा भेदच तिथे संपला आहे.



पुढचा दाखला देतात सोन्याचा. सोन्याने सोने झाकले कसे जाईल? भक्त हा सोन्यासारखा हे यातून सूचित होते. सोने हे किमती, चमकदार आणि तेजस्वी असा मौल्यवान धातू आहे. भक्ताच्या ठिकाणी हे सारे गुणविशेष आहेत. त्याच्या ठिकाणचे सर्व विकार नाहीसे झाले म्हणजे तो अतिशय तेजस्वी झाला.
असा भक्त हा दुर्मीळ, मौलिक असतो. सोन्याला मोठी परीक्षा द्यावी लागते. जाळ सहन करावा लागतो. त्यातून ते अधिक तेजस्वी, चमकदार होते. साधकालाही साधनेच्या खडतर पायऱ्या पार व्हायला हव्या, तेव्हा तो आदर्श भक्त या पदापर्यंत पोहोचतो. मग असा भक्त हा बावनकशी सोनं जणू! परमेश्वराहून असा भक्त वेगळा कसा राहील? म्हणजे सोने सोन्याने झाकले कसे जाईल?



यानंतरचा दृष्टान्त दिव्याचा. दिवा म्हणजे तेजाचे प्रतीक. अंधार नाहीसा करणारा. भक्ताने भक्तीचा प्रवास करत मनातील अंधार नाहीसा केला. तो आता इतरांना प्रकाशित करतो आहे. ईश्वर तर स्वतः प्रकाशित, तेजस्वी तत्त्व. मग आता हे दोघे एक झाले (भक्त आणि देव) तर? कोण कोणाला प्रकाशित करणार?
या दृष्टान्तातून उमगतं ज्ञानदेवांचे मोठेपण! आपल्यापुढील श्रोते ज्ञान घ्यायला उत्सुक आहेत. त्यांची ही उत्सुकता टिकवून ठेवणे, इतकेच नव्हे तर त्यांना अधिक ज्ञान घेण्याची उत्कंठा वाढवणे हे कार्य ज्ञानदेव करतात अशा सुंदर दाखल्यांच्या योजनेतून. त्याविषयी काय आणि किती बोलावे? त्यातून किती आणि काय घ्यावे!
‘देणाऱ्याचे हात हजारो
दुबळी माझी झोळी...’

manisharaorane196@ gmail.com

Comments
Add Comment

भाग्यविधाता

सद्गुरु वामनराव पै, जीवन संगीत आपला जो विषय आहे, अंधारातून प्रकाशाकडे त्याचा सरळ अर्थ आहे. तो म्हणजे अज्ञानातून

जैमिनीमुनी (पूर्वार्ध)

डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी …anuradh.klkrn@gmil.com फार पूर्वी सर्व वेदमंत्र एकत्रच होते. त्या सहस्त्रावधी मंत्रात काहीत

मोह

प्राची परचुरे-वैद्य, आत्मज्ञान भाणूस जन्माला आला की त्याचे आयुष्य सुरू होते ते अगदी मरेपर्यंत. त्या

गुरू : एक किल्ली मुक्तीची

ऋतुजा केळकर, ऋतुराज गुरू प्रकाशी ज्ञानदीप, शिष्य हृदयी उजळतो । संसारसागर पार करावा, श्रद्धा विश्वास आधारतो

अध्यात्मिक जागृतीचे प्रतीक... कुंकुमतिलक

अर्चना सरोदे, मानाचा गाभारा हिंदू धर्मात विविध प्रकारच्या रुढी, परंपरा पाळल्या जातात. हिंदू धर्मात कपाळावर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात