नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, ग्रेटर नोएडासह एनसीआरमधील अनेक भागांमध्ये पाणी भरल्याची स्थिती आहे. दिल्ली-एनसीआरमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची दृश्ये समोर आली आहेत. यामुळे गाड्यांचा वेग मंदावला असून बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली आहे.
३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा बनत आहे. यामुळे दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये २९ ऑगस्टलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पाणी भरल्याने ट्रॅफिक जाम
अनेक ठिकाणी पाणी भरल्याने सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. दिल्लीच्या घौला कुआं, एम्स चौराहा, मूलचंद चौराहा, आयआयओ, दिल्ली कँट, द्वारका सेक्टर १३, ८ आणि १९ चौराहा, महिलापालपूर-द्वारका अंडरपाससह अनेक भागांमध्ये ट्रॅफिक जाममुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.