Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPolitics : पश्चिम महाराष्ट्रात भाजपा शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

Politics : पश्चिम महाराष्ट्रात भाजपा शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

विनोद तावडेंची शरद पवार गटाच्या नेत्याशी बंद दाराआड खलबत

शिराळा : एका बाजूला समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, विवेक कोल्हे हे नेते भाजपe (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि ३२ शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) हे भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी नुकतीच नाईक यांची भेट घेतली. दोघांची बराच वेळ बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे शिराळ्यात भाजपा शरद पवार यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

सांगलीत नुकताच भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळावा संपल्यानंतर तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

नाईक यापूर्वी भाजपामध्येच होते. २०१४ मध्ये ते भाजपाकडून आमदारही झाले होते. पण २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानसिंगराव नाईक यांनी शिवाजीराव नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपाचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीमध्ये आले होते. मात्र आता ते पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

सध्या शिराळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मानसिंगराव नाईक आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाला सुटणार असल्याचे दिसून येते. भाजपाकडून सध्या सम्राट महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. ते गत पाच वर्षापासून आमदारकीसाठी तयारी करत आहेत. तसेच माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हे देखिल भाजपाकडून उमेदवारी मागत आहेत. अशात आता शिवाजीराव नाईकही भाजपामध्ये आले तर उमेदवारी कोणाला मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवाजीराव नाईक हे १९७९ ते १९९२ या काळात सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. १९९५ मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले. युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यानंतर १९९९ मध्ये राष्ट्रवादीतर्फे तर २००४ मध्ये अपक्ष आमदार झाले. २००९ मध्ये ते काँग्रेसकडून लढले पण त्यांचा पराभव झाला. यानंतर २०१४ मध्ये ते भाजपातर्फे आमदारकीचा ‘चौकार’ मारत विधानसभेत पोहोचले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -