Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा...

Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सुभाष म्हात्रे

अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai-Goa highway) नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या आणि अपघातग्रस्त वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या मुंबईतील बांद्रा येथील मे. चेतक एंटरप्रायझेस लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व या प्रकल्पावर काम करणारे कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्तीं विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांच्या तक्रारीवरुन माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदेव्दारे चेतक इंटरप्राईजेस लिमिटेड आणि अॅपको इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त उपक्रमास १ जून २०१७ रोजी करार करुन १८ डिसेंबर २०१७ रोजीपासून कंत्राट सुरु करण्यात आले होते. महामार्गाच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या जागेपैकी सर्वसाधारणपणे ९१.८० टक्के इतकी बोजारहित जागा शासनातर्फे हस्तांतरीत करण्यात आली होती. ठेकेदार यांचेकडून सदर काम दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावयाचे होते. सदर कालावधी संपल्यानंतरही मुदतवाढ मिळूनही ठेकेदार यांच्याकडून सदर मुदतवाढ कालावधीत मासिक १० टक्के या वेगाने काम पूर्ण न होता फक्त ४.६ टक्के या वेगाने काम झाले. ठेकेदार यास महामार्ग प्राधिकरणाकडून तीन वेळा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.

या दरम्यान कंत्राटदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामाचा दर्जा तपासून त्याने कामाचा योग्य दर्जा न राखता निकृष्ट दर्जाचे काम केल्याबाबत वेळोवेळी केंद्र शासनामार्फत सदर कामाच्या गुणवत्ता नियंत्रणावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अभियंता मे.ब्लूम एल.एल.सी.यु.एस.ए. शाखा महाड यांच्या मार्फतीने एन.सी.आर. देण्यात आलेले आहेत. तथापि नमूद कंत्राटदार यांच्या कामामध्ये काही सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही.

काम पूर्ण झालेल्या ठिकाणांपैकी काही ठिकाणी कामाकरिता डायव्हर्जन घेऊन महामार्गाच्या एकाच लेनवरुन जाणारी व येणारी वाहने वाहन चालकांना धोकादायक स्थितीमध्ये चालविणे भाग पडत होते. ज्याठिकाणी काम पूर्ण झालेले नाही, त्याठिकाणी रस्त्याचा भाग उखडून जागोजागी खड्डे पडलेले आहेत, तर काही ठिकाणी नव्याने करण्यात आलेला रस्ता आणि जुना रस्ता यामधील काही भाग खोदून ठेवून ते काम पूर्ण न करता, तो तसाच अपूर्ण ठेवून दिलेला आहे. ज्याठिकाणी अशाप्रकारे काम अपूर्ण ठेवलेले आहे, त्याठिकाणी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणताही धोका निर्माण होऊ नये याकरिता कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केलेल्या नाहीत. परिणामी नमूद महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याच्या अशा धोकादायक परिस्थितीची कोणतीही जाणीव व अंदाज येत नसल्याकारणाने अर्धवट काम सोडून धोकादायक स्थितीमध्ये ठेवून दिलेल्या महामार्गावर वारंवार मोटार अपघात होत अशा मोटार अपघातांमध्ये अनेक प्रवाशांची जीवितहानी झालेली असून, अनेक प्रवासी हे गंभीर, तसेच किरकोळ दुखापतग्रस्त झालेले आहेत.

दरम्यान, मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (बांद्रा, पश्चिम) यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कि.मी. नंबर ८४ ते कि.मी. नंबर १०८ या ठिकाणच्या इंदापूर ते वडपाले, जि. रायगड या भागातील महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकीकरणाचे काम सुरु केले; परंतु त्यांनी सदरचे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहीन काम केले व दर्जाहीन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास पडलेल्या खड्यांमुळे, तसेच काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये धर्मोप्लास्टीक पेंट (पांढऱ्या रंगाच्या पट्टया),कॅट आईज,डेलीनेटर,वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती/सुचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. तथापि त्यांनी या उपाययोजना न केल्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या सन २०२० पासून आजपर्यंत एकूण १७० मोटार अपघात होण्यास व त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस आणि एकूण २०८ प्रवाशांना लहान/मोठ्या स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती होण्यास त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत ठरल्यानेच हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठेकेदाराविरोधात दाखल झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -