पुणे : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे (वय ८१) (Suhasini Deshpande) यांचे मंगळवारी काल (२७ ऑगस्ट) पुण्यात कर्करोगाने निधन झाले. आज (२८ ऑगस्ट) सकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुहासिनी देशपांडे यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात १२व्या वर्षी नृत्यांगना म्हणून केली होती. पुण्यातील स्टुडिओत नृत्य कलाकार आणि ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर ‘बेबंदशाही’ या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘चिरंजीव आईस’ आणि ‘सासूबाईंचं असंच असतं’ यांसारख्या नाटकांतून त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल्या.
चित्रपट सृष्टीतही त्यांनी ‘देवकीनंदन गोपाला’, ‘पुढचं पाऊल’, ‘आई शप्पथ’, ‘माहेरची साडी’ अशा शंभरहून अधिक चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांची कारकीर्द हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय ठरली, जसे ‘वक्त के पहले’ आणि ‘सिंघम’.
देशपांडे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांनी आणि मराठी कलाक्षेत्रातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले की, “सुहासिनीजींच्या निधनामुळे मराठी कलाक्षेत्रातील एक अनुभवी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.”
अभिनय क्षेत्रात आपल्या सात दशकांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीनंतर, सुहासिनी देशपांडे यांचे निधन मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीसाठी एक मोठी हानी आहे. त्यांच्या योगदानाची आठवण नेहमीच प्रेरणादायी राहील, असे त्यांनी म्हटले आहे.