Tuesday, April 15, 2025
Homeताज्या घडामोडीVeer Murarbaji… Purandarki Yudhgatha: ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ची रिलीज डेट ठरलीच; ‘हा’ लोकप्रिय...

Veer Murarbaji… Purandarki Yudhgatha: ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ची रिलीज डेट ठरलीच; ‘हा’ लोकप्रिय अभिनेता झळकणार महाराजांच्या भूमिकेत

मुंबई : अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक म्हणजे रणझुंजार मुरारबाजी देशपांडे होय. धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून पुरंदरच्या वेढ्यात झालेल्या शेकडों गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा असणार आहे. ‘काळभैरव’ म्हणून स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १४ फेब्रुवारी २०२५ ला ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावरपाहायला मिळणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मालिका विश्वामधील ‘श्रीकृष्ण’ आणि ‘महादेव’ यांची तसेच ‘ओम नमो व्यंकटेशाय’ या दाक्षिणात्य चित्रपटात ‘तिरुपती बालाजी’ यांची भूमिका साकारत प्रचंड लोकप्रियता मिळवणारे अभिनेते सौरभ राज जैन (Sourabh Raaj Jain) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे.

“सगळ्या देवतांच्या भूमिका तसेच आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणं हे मी माझं भाग्यचं समजतो. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी साकारत असलेल्या भूमिकेला ही प्रेक्षकांचं हेच प्रेम मिळेल,” अशी आशा सौरभ राज जैन यांनी व्यक्त केली आहे.

१६६५ सालीच्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला आणि सर्व प्रेक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले.

१४ फेब्रुवारी २०२५ मध्ये हा चित्रपट हिंदी आणि मराठीमध्ये देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -