Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMarathi Natak : 'सूर्याची पिल्ले' पुन्हा अवतरणार रंगभूमीवर!

Marathi Natak : ‘सूर्याची पिल्ले’ पुन्हा अवतरणार रंगभूमीवर!

रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगणार शुभारंभाचा प्रयोग

मुंबई : मराठी रंगभूमी आणि प्रेक्षकांचं एक खास नातं आहे. मनोरंजनाची कितीही माध्यमं आली तरी रंगभूमीविषयीचा जिव्हाळा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच नाटकांच्या प्रयोगांना आजही गर्दी होताना दिसते. असंच प्रेक्षकांनी एकेकाळी डोक्यावर घेतलेलं एक नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ (Suryachi Pille) असं या नाटकाचं नाव आहे. प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळवणारं हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार असल्याने मराठी रसिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. येत्या २२ सप्टेंबर रोजी मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस (Royal Opera House) या ठिकाणी या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील बर्वे यांनी १४ वर्षांपूर्वी ‘हर्बेरियम’ उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यात वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकाचा देखील समावेश होता. त्यावेळी प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम, त्यांची पुन्हा हे नाटक रंगमंचावर आणण्याची मागणी, या सगळ्याचाच मान राखत आम्ही ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येत आहोत, असं सुनील बर्वे याबाबत म्हणाले.

सुबक निर्मित नवनीत प्रकाशित प्रस्तुत ‘सूर्याची पिल्ले’ हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. या नाटकाचा शुभारंभ २२ सप्टेंबरपासून होणार आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे. यानिमित्ताने सूर्य होऊ न शकलेल्या त्याच्या पिल्लांची पोटभर हसवणारी, मनभर सुखावणारी एक कानेटकरी क्लासिक कॉमेडी नाट्यरसिकांना परत अनुभवायला मिळणार आहे. हलक्या फुलक्या विनोदातून विचार करण्यास भाग पाडणारे असे हे नाटक आहे.

काय म्हणाले सुनील बर्वे?

खरंतर ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक कोरोनानंतर लगेच आणण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झाले नाही. परंतु आता सगळ्या गोष्टी नीट जुळून आल्याने आम्ही पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहोत. हे नाटक जुन्या काळातील असल्याने त्याचा ठहराव जपत, मूळ संहितेसह हे नाटक समोर येणार असल्याचे सुनील बर्वे यांनी सांगितले.

नाटकात कलाकारांची मांदियाळी

प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुहास परांजपे, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप, अतिषा नाईक आणि अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या नाटकाचे सुनील बर्वे, नितीन भालचंद्र नाईक निर्माते आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -