बदलापूर : बदलापुरात चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलक आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करत येत्या काळात येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना त्रास देऊ नका अशा सूचना केल्या. मात्र, राज ठाकरे यांनी आपला दौरा १५ ते २० मिनिटात आटोपता घेतल्याने त्यांच्या भेटीसाठी थांबलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
बदलापूर येथील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संगिता चेंदवणकर यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कठोर शब्दात आपली भूमिका मांडली. तर चेंदवणकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांची पाठही थोपटली होती.
या प्रकरणात शहरात मोठे आंदोलन झाले. त्यानंतर आंदोलकांवर विविध कलामान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. त्यामुळे आंदोलक चिंतेत आहेत. या आंदोलक आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे बुधवारी बदलापुरात आले होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास ठाकरे यांचे बदलापुरात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी अवघी काही मिनीटे पालक आणि आंदोलकांशी संवाद साधला. त्यानंतर राज ठाकरे यांनी रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती संगिता चेंदवणकर यांनी दिली आहे. मात्र अवघ्या १५ ते २० मिनिटांत ठाकरे यांनी आपला दौरा आटोपता घेतल्याने ते हॉलमध्ये परत येतील या अपेक्षेने हॉलमध्ये बसून राहिलेल्या पालक आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.