काय आहे प्रतिकिलो लसणाचा भाव?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना लागणाऱ्या गरजोपयोगी गोष्टींचे भाव (Price Hike) साततत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. अशातच गृहिणींच्या स्वयंपाक घरातील लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागल्याचे (Garlic Price Hike) चित्र दिसून येत आहे. लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत आहेत. त्यामुळे आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना वाढलेल्या लसणाच्या दरामुळे महागडा लसूण विकत घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न पडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून लसणाच्या लागवडीत घट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला लसूण विक्रीसाठी बाहेर काढला होता. त्यामुळे यंदा लसणाची साठवणूक कमी आणि ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजारात सध्या लसूणचा भाव ४०० रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. तर हाच लसूण घाऊक बाजारात २०० ते ३२० रुपये प्रतिकिलो रुपयांवर विकला जात आहे. पुढील काही महिन्यांत हा भाव आणखी वाढून तब्बल ६०० रुपयांपर्यंत पोहचू शकतो अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
लसणाचे दर कमी केव्हा होणार?
लसूण महागल्यावर आता पुन्हा दर किती दिवसांपर्यंत कमी होतील असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत याहे. जानेवारी ते मे या कालावधीमध्ये नवीन लसूणचे उत्पादन होते. त्यानंतर आवक फेब्रुवारीपर्यंत सुरळीत होते. त्यामुळे या वर्षी तरी नागरिकांना महागडाच लसूण खावा लागणार असल्याची शक्यता आहे.