कट्टर विरोधक नारायण राणे आणि विजय वडेट्टीवारही आले आमनेसामने
मालवण : राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा अवघ्या आठ महिन्यांतच कोसळल्याने राज्यभरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांकडून मात्र या गोष्टीचे फोटोज व्हायरल करत राजकारण केलं जात आहे. यावरुन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील टीका केली होती. यानंतर आज महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याचवेळी खासदार नारायण राणे (Narayan Rane) किल्ल्यावर पोहोचल्याने ठाकरे आणि राणेंचे समर्थक एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. तसेच कट्टर विरोधक असलेले नारायण राणे आणि विजय वडेट्टीवारही आमनेसामने आले, मात्र त्यांनी यावेळेस हस्तांदोलन केले.
महाविकास आघाडीमधील नेत्यांसह सत्ताधारी महायुतीमधील नेतेसुद्धा पोहोचले आहेत. खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोटवर पोहोचले. या दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सुद्धा पोहोचले. महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थक सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले आहेत. राणे समर्थक आणि राऊत समर्थक आमने सामने आल्याने राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग सुद्धा घडला.
महाविकास आघाडीकडून भरड नाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. हा राडा एका बाजूने सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचले. यावेळी पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. सध्या मालवणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.