अमरावती : अमरावती येथील एका सीएससी केंद्रावर काही शेतकर्यांनी फळपीक विमा काढण्यासाठी संचालकाकडे प्रीमियमची रक्कम दिली. त्याने ती रक्कम भरल्याच्या संगणकीकृत पावत्या शेतकर्यांना दिल्या; परंतु त्या शेतकर्यांना नुकसान झाल्यावरही पीकविमा संरक्षित रक्कम मिळाली नाही. त्यावेळी शेतकर्यांनी चौकशी केली असता त्याने बनावट पावत्या देऊन ही प्रीमियम रक्कम शासनाकडे भरलीच नसल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी शेतकर्याच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी सीएससी संचालक अमोल चरणदास क्षीरसागर (३०) रा. वरूड यांच्याविरुद्ध रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पोलिसांकडे नीलेश दिनेश देशमुख (३९) रा. टेंभुरखेडा यांच्यासह आठ शेतकर्यांनी तक्रार दिली आहे. २०२२ मध्ये नीलेश देशमुख यांच्यासह अन्य काही शेतकर्यांनी क्षीरसागर यांच्या सीएससी सेंटरवर जाऊन फळपीक विमा घेण्यासाठी २ लाख २७ हजार ३८४ रुपये प्रीमियम रक्कम भरली. याच दरम्यान काही शेतकर्यांनी फळपीक विमा प्रीमियम रक्कम बँकेत भरून विमा घेतला. कारण बँकेत आणि सीएससी अशा दोन्ही ठिकाणाहून विमा घेण्याची सुविधा उपलब्ध होती.
दरम्यान ज्या शेतकर्यांनी बँकेत प्रीमियम भरला होता, त्या शेतकर्यांना झालेल्या नुकसानीचा विमा मंजूर होऊन २०२३ मध्ये पैसे मिळाले. वास्तविक, यावेळी नुकसान या आठ शेतकर्यांचेही झाले, परंतु त्यांना विमा रक्कम मिळाली नाही. त्यांनी याबाबत बँकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यात विम्याची रक्कमच जमा झाली नव्हती. दरम्यान या शेतकर्यांनी क्षीरसागर यांच्याकडे विचारणा केली, त्यावेळी त्याने सुरुवातीला तुमची रक्कम भरली आहे, विमा येईल अशा पद्धतीने उडवाउडवीचे उत्तर दिले. शेतकर्यांना संशय आल्यानंतर मात्र त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. क्षीरसागरने त्यांना पैसे भरल्याची पावती दिली होती. ती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ही पावती कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून तपासून घेतली. त्यावेळी ही पावती बनावट असल्याचे समोर आले.