Saturday, August 30, 2025

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्यासाठी हावडा ब्रिजवर विद्यार्थ्यांचे 'नबन्ना आंदोलन'

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्यासाठी हावडा ब्रिजवर विद्यार्थ्यांचे 'नबन्ना आंदोलन'

डॉक्टरवर लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणाने संतापले विद्यार्थी

हावडा ब्रिजवर आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला वॉटर कॅननचा मारा

अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्जही केला; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. हावडा ब्रिजवरून पुढे येऊ पाहणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर वॉटर कॅननचा मारा करण्यात येत आहे. असे असताना विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.

हावडा ब्रिज बंद करण्यात आले आहे. ब्रिजवर लोखंडाचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याचे देखील पाहायला मिळाले. आतापर्यंत अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आंदोलकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. संतप्त विद्यार्थ्यांनी बॅरिकेडिंग तोडली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलीस आंदोलनकर्त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

आंदोलनामध्ये अनेक कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, राजकारणाशी त्यांना काही देणं-घेणं नाही. त्यांना फक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजीनामा हवा आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी नबन्ना आंदोलन सुरु केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत. अभयाला न्याय, दोषीला मृत्यूची शिक्षा आणि ममता बॅनर्जी यांचा राजीनामा.

कोलकात्यामधील आरजी कार मेडिकल रुग्णालयामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सध्या या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे.

Comments
Add Comment