कणकवली : राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक मंडळी घाणेरडं राजकारण करत आहेत. भाजप सरकारला टार्गेट करत आहेत. पुतळा कोसळावा अशी कुणाचीच इच्छा नव्हती. पुतळा उभारणीमध्ये सर्वांनीच शंभर टक्के योगदान दिले होते. पण या घटनेचे राजकारण करून विरोधक विनाकारण सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी आज केली.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, पुतळा कोसळणे ही घटना राजकीय नाही. प्रत्येक माणसाला या घटनेमुळे तीव्र दु:ख झालंय. पुतळा उभाारणीसाठी पालकमंत्र्यांसह सर्वांनीच प्रामाणिकपणे योगदान दिलंय. तसंच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी पालकमंत्र्यांसह आम्ही सर्वांनी केली आहे. कुणालाही या प्रकरणी पाठीशी घातलं जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. परंतु राज्यभरातील विरोधी पक्षाची नेतेमंडळी मालवणात येऊन सरकारवर टीका करत आहेत. या मुद्द्यावर घाणेरडं राजकारण करत आहेत हे चुकीचं आहे.
राणे म्हणाले, आज सतेज पाटील यांनीही मालवणात येऊन टीका केली. पण विशाळगडावरील अतिक्रमणाबाबत ते काहीही बोलेले नाही. गडकिल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत त्यांची काय भूमिका आहे हे आधी त्यांनी स्पष्ट करायला हवं. अाज कणकवली शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दुग्धाभिषेक केला. पण हाच पुतळा महामार्गाच्या मध्यभागी होता. कधीही अपघातग्रस्त होण्याची शक्यता होती. त्यावेळी ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याची फिकीर नव्हती. आमची सत्ता आल्यानंतर हा पुतळा आम्ही महामार्गाच्या बाजूला हलवला. त्यावेळी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे शिवरायांवरील प्रेम कुठे गेले होते असे राणे म्हणाले.