कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) पुन्हा एकदा पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी १० फुटांनी वाढून ३४ फूटांवर पोहोचली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून, पुढील दोन दिवसांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरण क्षेत्रात सलग तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. राधानगरी धरणातील पाणी पातळी स्थिर झाल्यानंतर उघडलेले पाच दरवाजे बंद करण्यात आले होते, मात्र दोन दरवाजांतून अजूनही ४,३०० क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे.
या धरण क्षेत्रात २४ तासांत १६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.काळम्मावाडी धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पाच दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या दरवाजांतून २,००० क्युसेस पाणी आणि पायथा वीजगृहातून १,००० क्युसेस पाणी दूधगंगा नदीत सोडले जात आहे. धरणात यंदा गळतीमुळे २२ टीएमसी पाणीसाठ्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे, परंतु सध्या धरणात २३ टीएमसीहून अधिक पाणी साठवले गेले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात दुसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या परिसरात दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, तर माळरानावरील पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.