मुंबई, ठाण्यात कसा साजरा होतोय दहीहंडी उत्सव?
मुंबई : आज सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जात आहे. वेगवेगळी गोविंदा पथके जास्तीत जास्त थर लावण्यास सज्ज झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे टेंभीनाका येथील मानाची हंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. तर मुंबईच्या प्रसिद्ध जांबोरी मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई आणि परिसरातील विविध दहिहंडी कार्यक्रमांना लावणार हजेरी लावणार आहेत. याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहिल्यानंतर ते ठाणे, घाटकोपर, कुर्ला, मागाठाणे, कांदिवली, मिरारोड पुन्हा ठाणे अशा विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहतील.
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे दहीहंडी आयोजित केली आहे. या दहीहंडीला नृत्यांगना गौतमी पाटीलने हजेरी लावली होती. यावेळी ती विविध गाण्यांवर थिरकल्याचे पाहायला मिळाले. भांडुप मध्ये जय जवान पथकाकडून नऊ थरांची सलामी दिलेली आहे. चार एके लावून जय जवान पथकाने ही नऊ थरांची सलामी दिली. भांडुपमध्ये मनसेच्या दहीहंडीमध्ये जय जवान पथकाने हे थर लावले आहेत.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी
शिवडी विधानसभेतील ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग येथे भाजपने यंदा पुन्हा दहीहंडीचे आयोजन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सह मराठमोळे सेलिब्रिटींनी याठिकाणी हजेरी लावली. विशेष म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांच्या पोस्टरसोबत याठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही बॅनर्स झळकत आहेत.