मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये (TISS) शिक्षण घेणारा विद्यार्थी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. अनुराग जयस्वाल असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनुराग जयस्वाल हा टीसच्या मानव संसाधन कार्यक्रम म्हणजेच ह्यूमन रिसोर्सचा भाग होता. तो मूळचा लखनऊचा होता.
अनुराग जयस्वाल शनिवारी रात्री वाशी येथे आपल्या मित्रांसह एका पार्टीत गेला होता. येथे तो आणि त्याचे मित्र मद्यधुंद होते, अशी माहिती समोर आली आहे. रात्री झोपलेला अनुराग हा सकाळी जागा झालाच नाही. त्याला सकाळी जाग न आल्याने मित्रांनी चेंबूर येथील स्थानिक रुग्णालयात नेले. तेथे पोहोचल्यावर अनुरागला मृत घोषित करण्यात आले.
अनुरागच्या सर्व मित्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यासोबत रॅगिंग झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने अनुरागच्या मृत्यू संदर्भात ट्वीट केले आहे. एका पोस्टमध्ये संस्थेने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आमचे विचार आणि प्रार्थना अनुरागच्या कुटुंबीयांसोबत नेहमी असेल. ‘आम्ही TISS मुंबईच्या HRM आणि LR चे प्रथम वर्षाचे विद्यार्थी, अत्यंत दुःखाने आणि जड अंतःकरणाने अनुराग जयस्वाल यांचे निधन झाल्याची घोषणा करत आहोत. या हृदयद्रावक प्रसंगी आम्ही अनुरागच्या कुटुंबासोबत आहोत. आमचे विचार आणि प्रार्थना नेहमीच अनुरागच्या कुटुंबासोबत असतील,’ असेही त्यात म्हटले आहे.