६८ वर्षीय नराधमाला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. याचदरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात एका १० वर्षाच्या मुलीवर एका विकृत नराधमाकडून खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खडकवासला येथे घडली आहे.
या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप नामदेव मते (वय ६८, रा. खडकवासला) याला अटक करण्यात आली आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, तक्रार समजून घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी मुलींना बाजूला घेऊन विश्वासात घेऊन विचारणा केली असता एका मुलीने आपल्या बाबतीत घडलेली धक्कादायक घटना सांगितली. तेव्हा ही संतापजनक घटना उघडकीस आली.
आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचं पीडित मुलीने सांगितले आहे. शिक्षिका, मुख्याध्यापक यांनी तातडीने याबाबत पालक शिक्षक संघातील सदस्यांशी चर्चा केली आणि हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.