रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वेमार्गाची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने आज सकाळी कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दोन तास बंद पडली.
वाहतूक बंद राहिल्याने गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत आणि जनशताब्दी एक्स्प्रेस गाड्या थांबवून ठेवाव्या लागल्या. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली या मार्गावर देखभालीसाठी फिरणारे सीएमएस मशीन अचानक बंद पडले. त्यामुळे याचदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली-एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. त्यामुळे विविध स्थानकांवर थांबून ठेवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.
या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास यश आले. त्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.