मुंबई : महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत भूपेश बघेल यांना मोठा दणका दिला आहे. महादेव बेटींग अॅप प्रकरणाचा तपास आता राज्य सरकारने सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे सोपवण्यात आली असून आता पुढील सगळी कारवाई सीबीआय करणार आहे. त्यामुळे हा भूपेश बघेल यांना मोठा धक्का मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी महादेव बेटींग अॅप प्रकरण सीबीआयकडं सोपवल्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी बोलताना गृहमंत्री विजय शर्मा म्हणाले की, छत्तीसगडच्या गृह मंत्रालयाने महादेव बेटींग अॅप प्रकरण सीबीआयकडे सोपवल्याची अधिसूचना जारी केली आहे. महादेव अॅपची ७० प्रकरणे आहेत. सर्व प्रकरणे एका राज्यातून दुसऱ्या राज्याशी जोडली जात असल्याची चर्चा होती. महादेव अॅपशी संबंधित आरोपी परदेशात राहत असल्याचीही माहिती पुढं आली आहे.
महादेव बेटींग अॅप प्रकरणाचा तपास करताना आतापर्यंत ईडीने ११ आरोपींना अटक केली. महादेव अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची ईडी तब्बल १६ महिन्यांपासून चौकशी करत आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या काळात महादेव बेटींग अॅप प्रकरणातील आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी, राजकारण्यांचा समावेश असल्याचा आरोप ईडीने केला. ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात तब्बल ६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांच्या व्यतिरिक्त सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीदेखील महादेव अॅपची चौकशी करत आहे.