मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपतींचा पुतळा कोसळणारी घटना संशयास्पद आहे. त्या ठिकाणी विरोधकांकडून जातीय दंगल निर्माण करण्यासाठी हा कट आखला जाण्याची शक्यता आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर (Atul Kalsekar) यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, सीसीटीव्ही फुटेज, सॅटेलाइट फुटेज या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्य व देशाच्या गृह विभागाकडे केली आहे.
याबाबतची माहिती त्यांनी (Atul Kalsekar) प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की, नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानाने ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर नौदलामार्फत हा पुतळा उभा करण्यात आला. प्रथमच असे ऐतिहासिक ठिकाण पुन्हा उभे करण्यात आले. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यानिमित्ताने या जिल्ह्यात नौदल दिनाच्या प्रमुख कार्यक्रम झाला. यात केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमालाही जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सरकारचे कौतुक केले. हे कौतुकही विरोधकांना रुचलेले नाही. आणि त्यामुळेच हा पुतळा पडण्यामागे राजकीय कटकारस्थान आहे असा आपला संशय आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.