भिवंडी : भिवंडीत शांतीनगर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून २१ लाख २० हजार रुपये किमतीचा १०६ ग्रॅम एमडी व १५ लाखांची बीएमडब्ल्यू कार व पिस्टल असा एकूण ३७ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हेगारी कारवायांमुळे शहरातील हद्दपार केलेला मोहम्मद अली अब्दुल अजीज शेख हा शहरात एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाने त्यास शांतीनगर परिसरातून ११ लाख २० हजार रुपये किमतीचा ५६ ग्रॅम एमडी जप्त केला.
त्याचवेळी तपासात नाशिक येथील दोन जण एमडी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर साईबाबा मंदिर परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित बीएमडब्ल्यू कारमधील दोघा जणांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ १० लाख रुपये किमतीचा ५० ग्रॅम एमडी आढळून आला. मुज्जफर मोबिन शेख व समीर फिरोज रोकडीया दोघे रा. नाशिक रोड यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील मोबाईल ताब्यात घेऊन तपासले असता त्यामध्ये हातात पिस्टल घेऊन वावरत असतानाचा व्हिडिओ आढळून आला.
त्यानुसार पोलिसांनी नाशिक रोड येथील त्याच्या घरातून पिस्टल जप्त केले आहे. या दोन्ही प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.