हलकं-फुलकं- राजश्री वटे
दोघं सोबत नसली तर निभतं…
पण सोबत असली तर सजतं!
या दोघांच्या नात्याला काय बरं नाव द्यावं!
एक सुंदर पवित्र अस्तित्व लाभलेली ही जोडी म्हणजे…
समई आणि झेंडू!!
सुंदर, सोनेरी ऐश्वर्य संपन्न ही जोडी… कोणत्याही पूजेची श्रीमंती वाढवते.
समई म्हणजे तर, पूजेच्या सोहोळ्यातील राणीच जणू…
अन् तिच्या पाठोपाठ हिरवा कद, वर पिवळा केशरी शेला पांघरून हा झेंडू मिरवलाच पाहिजे!
पूजा सोहळ्यामधील हे पहिले मानकरी,
इतकं देखणं रूप लाभलेली समई…
जरासं रांगडं रूप असलेला झेंडू!!
समई म्हणजे लावण्यमय तेजाळणारं रूप आहे प्रकाशाचं… जशा ज्योती प्रज्वलित होतात…
तिची सोनेरी कांती झळाळत जाते! समई जितकी उंच,
तितका तिचा रुबाब वाढत जातो आणि रंगमंचावर मोठमोठ्या हस्तींमध्ये दिमाखाने मिरवते! दीपप्रज्वलनाच्या सोहळ्यामध्ये प्रज्वलित झालेल्या ज्योतींमुळे जो उष्मा ती सहन करते, त्यावेळी तिच्या कायेला लपेटून घेतो स्वतःला नखशिखान्त आणि शीतलता प्रदान करतो अलवार हा झेंडू… एक चंदेरी तेजाचं वलय दृष्टीस पडतं!
प्रेम, भक्ती यांच मनोमिलन नतमस्तक करतं सहज! कधी-कधी तर या झेंडूचं प्रेम समईच्या बाबतीत एव्हढ उफाळून येतं की, स्वतःला विसरून चक्क तिच्या पायाशी लोळण घेतो, त्या मखमली पिवळ्या गालीच्यावर मध्यभागी तिला उभी करतो… काय थाट वर्णवा… त्या गालीच्याला हिरव्या देठाची महिरप… जणू लक्ष्मणरेषा आखली आहे… तिचं अपहरण कोणी करू नये म्हणून! तेजाळलेल्या ज्योतीने काजळी धरते… जणू तिच्या सौंदर्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून… उंच समईचा दिमाख वेगळा तर… जितकी समई लहान, तितकी ऐटबाज! हिचं स्थान देवघरात… शांत, मंद तेवणाऱ्या ज्योती जणू ध्यानस्थ झाल्या आहेत.
मन ही शांत होतं तिच्या सहवासात…
देवळाच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ भारदस्त समईचं अढळ स्थान तर, देव्हाऱ्यासमोर सुबकशी छोटी समई उजळवून टाकते तो कोपरा… तिच्या मंद प्रकाशात!!
आणि दोन्ही ठिकाणी झेंडूचं झुलणारं सुबक तोरण!
असं या दोघांचं ‘गुळपीठ’… सणवाराचं, व्रत वैकल्याचं, लग्न समारंभाच… अशा अनेक पवित्र सोहळ्याचा गोडवा वाढत नेतं.
आसमंतातही नाद घुमतो…
वाह! वाह!! रामजी…
जोडी क्या बनायी!!!