अनेक प्रवासी जखमी, दोघांचा मृत्यू
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ शिवारात एसटी महामंडळाच्या बसचा भीषण (Bus Accident) अपघात झालाय. बस पलटी झाल्याने अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी २ प्रवाश्यांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
नागपूर अकोला बस क्रमांक एमएच ०९-इएन १७७८ शिवशाही बस नागपूर वरून अकोल्या करीता प्रवाशी घेऊन निघाली असता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ शिवारात महामार्गावर एक गाय आडवी आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस ही रस्त्यालगत पलटी झाली. परिणामी या बसमध्ये प्रवास करीत असलेले काही प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सदरचा अपघात हा सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास झाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी बघितले व मदतीसाठी धावले पलटी झालेल्या बस मधून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या साह्याने बस उभी करण्यात आली. सर्व जखमी प्रवाश्याना ग्रामीण रुग्णालय व काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.