डॉ. अनुराधा कुलकर्णी, विद्यावाचस्पदी संत वाङ्मय अभ्यासिका
कृष्णवर्ण’ म्हणजे काळा रंग. म्हणून कुटिल नीतीला कृष्णनीती किंवा कृष्णकारस्थान असे म्हटले जाते. पण श्रीकृष्णाने अधर्माच्या नाशासाठी ज्या कृष्णनीतीचा वापर केला ती नुसती ‘कृष्णनीती’ नसून ‘श्रीकृष्णनीती’ होय. ‘श्री’ म्हणजे पावन तेजस्विता, अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता ही पावन श्रीकृष्णनीती होती. जेव्हा केवळ स्वतःच्या एकट्याच्या फायद्यासाठी कुटिलनीती वापरली जाते तेव्हा ती ‘कृष्णनीती’ ठरते पण जेव्हा साऱ्या समाजाच्या रक्षणासाठी कुटिलनीती वापरली जाते ती ‘श्रीकृष्णनीती’ ठरते.
कुरुवंशाचा ज्येष्ठ युवराज म्हणून युधिष्ठिराचा हस्तिनापुराच्या राजसिंहासनावर अधिकार होता. पण कुळातील कलह टाळण्यासाठी पांडवांनी हस्तिनापुरावरचा हक्क सोडून आपल्या पैतृक संपत्तीचे पण रानावनातले खांडवप्रस्थ स्वीकारले होते आणि तेथेही त्यांनी स्वकर्तृत्वाने देदीप्यमान साम्राज्य निर्माण केले पण तेही धार्तराष्ट्रांनी अनीतीने बळकावले आणि त्यावेळी पांडवांची सम्राज्ञी द्रौपदीची अक्षम्य विटंबनाही केली. तेव्हा संग्राम करून या अराजकाला मोडून काढणे पांडवांचे कर्तव्य होते. पण तरीसुद्धा संग्रामातील नरसंहार टाळण्यासाठी पांडवांनी केलेल्या संधिप्रस्तावाला, कृष्णशिष्टाईला दुर्योधनाने पूर्ण धुडकावले. अशावेळी पांडवांनी संग्रामाद्वारे आपला न्याय्य हक्क प्राप्त करणे सोडून दिले असते तर तो त्यांच्या क्षत्रियत्वाला कलंक ठरला असता.
अन्यायी लोकांविरुद्ध धर्मयुद्ध करणे पांडवांचे कर्तव्यकर्म होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे श्रीकृष्ण ठामपणे उभा राहिला. युद्धात अधर्माची हार होण्यासाठी धर्मनिष्ठ पांडवांचे जिंकणे श्रीकृष्णाला अत्यंत महत्त्वाचे वाटत होते. कुठल्याही राष्ट्राची सर्वांगीण प्रगती तेव्हाच होते, जेव्हा त्या राष्ट्राचा शासनकर्ता हा कर्तृत्ववान आणि सद्धर्मनिष्ठ असतो. कुरुवंशाच्या विशाल साम्राज्याला असाच शासनकर्ता आवश्यक होता. म्हणून श्रीकृष्ण अत्यंत कळकळीने पांडवांचा पाठीराखा झाला. जरी श्रीकृष्णाची नारायणी सेना कौरवांच्या बाजूने होती आणि या युद्धात हातात शस्त्र न घेण्याची त्याची प्रतिज्ञा होती तरी आपले सर्व बुद्धिचातुर्य त्याने या युद्धासाठी वापरले होते. साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग श्रीकृष्णाने या युद्धात चोखाळले. युद्धाला सुरुवात होण्याआधी श्रीकृष्णाने कर्णाला आपल्या रथात बसवून त्याचे जन्मरहस्य सांगितले व पांडवांच्या बाजूने लढण्यास त्याला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कर्णाने दुर्योधनाशी मित्रद्रोह होऊ नये, म्हणून कृष्णाचे म्हणणे ऐकले नाही.
युद्धात कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले असता, ते बाहेर काढेपर्यंत अर्जुनाने आपल्याशी युद्ध करू नये, असे युद्धधर्माचे आवाहन कर्णाने केले, त्यावेळी “अधर्माला साथ देताना तुझा धर्म कुठे गेला होता?” असे परखडपणे विचारणाऱ्या श्रीकृष्णाचे बोल आपल्याला फार मोठी नीती शिकवून जाते. जो राज्यकर्ता अनीतीने वागणारा आहे, ज्याच्यामुळे सारा समाज रसातळाला जात आहे, अशा राज्यकर्त्याला सहाय्य करणाराही अनितिमानच ठरतो. म्हणून त्याला कोणतीही दयामाया न दाखविता संपविणे सज्जनांचे कर्तव्य होय, असे श्रीकृष्णनीती सांगते.
कौरवांचे प्रथम सेनापती भीष्माचार्य युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवत होते. त्यांना जर रोखले गेले नाही, तर पांडवांची हार झाली असती. त्यावेळी अर्जुनालाही युद्धाचा पूर्ण जोश येत नव्हता, हे पाहून संतापलेल्या श्रीकृष्णाने हाती शस्त्र न धरण्याची आपली प्रतिज्ञा बाजूला ठेवली आणि तो भीष्मांवर चाल करून गेला. ही कथाही आपल्याला मोठे तत्त्व सांगून जाते. सद्धर्माच्या रक्षणापुढे प्रतिज्ञाभंग करण्यासही श्रीकृष्णाने मागे-पुढे पाहिले नाही!
युद्धात अत्यंत पराक्रम गाजविणाऱ्या द्रोणाचार्यांना हतबल करण्यासाठी अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारून द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामाच मेला, अशी आवई उठविण्याची श्रीकृष्णनीतीच होती. पण अधर्माला सहाय्य करणाऱ्या द्रोणाचार्यांसाठी अशी नीती आवश्यकच होती. दुर्योधनालाही गदायुद्धात जिंकणे सोपे नव्हते. आपल्या तेजदृष्टीने दुर्योधनाला अधिक सुरक्षित करण्यासाठी गांधारीने त्याला कपडे न घालता आपल्यासमोर यायला सांगितले. तो तसा जाऊ लागला तेव्हा त्याच्या वाटेवर उभ्या राहिलेल्या श्रीकृष्णाने त्याला, “आई जरी असली तरी तिच्यापुढे तू असा पूर्ण उघडा कसा जाऊ शकतोस?” असे म्हटले. दुर्योधनाने कृष्णाचे म्हणणे ऐकले आणि केवळ अंतर्वस्त्र घालून तो आईकडे गेला. गांधारीच्या नजरेने दुर्योधनाचे झाकलेले अंग सोडून बाकी अंग पोलादी बनले. तो भीमाबरोबर युद्ध करीत असता श्रीकृष्णानेच त्याला जांघेपाशी प्रहार करायला सांगितले. जे गदायुद्धाच्या नीतीत बसत नव्हते. तरी दुराचारी दुर्योधनाचा अंत आवश्यक असल्याने कृष्णाने ती नीती भीमाला पाळू दिली नाही आणि भीमाला दुर्योधनाच्या जांघेवर गदाप्रहार करायला लावून त्याचा पाडाव केला. या सर्व उदाहरणात कृष्णाने कुटिलनीती वापरली असली तरी ती सद्धर्माचे रक्षण करणारी होती. धर्माच्या रक्षणासाठीच तर भगवंतांचा अवतार असतो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
।। ७।। गीता, अ.४
श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे अर्जुना, ज्या ज्या वेळी धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म माजतो, त्या त्या वेळी धर्माच्या रक्षणासाठी मी स्वतः अवतार घेतो. अन्यायाला प्रतिकार करणारी जनता-जनार्दनामधली कार्यशक्ती जागृत करतो. अपराध्याला शासन करणे भगवंतांचे कर्तव्य होय. जी कृती फक्त स्वतःच्याच फायद्यासाठी केली जाते, तो अधर्म ठरतो आणि जी सर्वांच्या हिताचा विचार करून केली जाते, तेच खरे धर्मपालन होय. या महायुद्धात श्रीकृष्णाला स्वतःचा काहीच फायदा करून घ्यायचा नव्हता. फक्त त्याला न्याय्य बाजूच्या लोकांची पाठराखण करायची होती.
महाभारत युद्धाच्या शेवटी अश्वत्थाम्याने रात्रीच्या वेळी शिबिरात झोपलेल्या पांडवांच्या सर्व मुलांची अत्यंत अधर्माने हत्या केली. शिवाय अभिमन्यूची पत्नी उत्तरा हीच्या पोटी पांडवांचा एकुलता एक वंशज होता, त्यालाही ठार मारण्यासाठी अश्वत्थाम्याने उत्तरेच्या पोटावर ब्रह्मास्त्र सोडले. त्यामुळे उत्तरा प्रसूत झाली तेव्हा मृत बालक जन्माला आले. त्या निष्पाप अर्भकासाठी श्रीकृष्णाने हातात जल घेऊन धीर गंभीर आवाजात पुढील शब्द उच्चारले,
नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन।
न च युदधात् परावृत्तस्तथा संजीवतामयम् ।। अश्वमेधपर्व अ.६९.१९
‘‘मी चेष्टेतही कधी मिथ्या भाषण केले नसेल, युद्धात कधी शत्रूला पाठ दाखविली नसेल, युद्धातून पलायन केले नसेल तर त्या माझ्या पुण्यशक्तीने हे बालक जिवंत होईल’’
श्रीकृष्णाने वरील शब्द उच्चारले आणि त्या बालकात चैतन्य आले. ही घटनाच श्रीकृष्णनीतीचे माहात्म्य पूर्णतः सांगून जाते. द्रोणाचार्यांच्या पाडावासाठी त्यांच्या पुत्राच्या मरणाचे खोटे वृत्त पसरविणाऱ्या, जरासंघ व कालयवन मथुरेवर चाल करून आले तेव्हा होऊ घातलेला भयंकर नरसंहार टाळण्यासाठी युद्धातून पलायन करणाऱ्या श्रीकृष्णाची नीती ही व्यापक कल्याणाची होती. त्यामुळेच त्याचे बोल कधीही अनृत म्हणजे खोटे म्हटले गेले नाही की, युद्धातून तात्पुरती माघार घेऊनही ते त्याचे शत्रूला पाठ दाखविणे ठरले नाही. श्रीकृष्णनीती ही सदैव सद्धर्माचे रक्षण करणारीच महान नीती होती…!!