नॉस्टॅल्जिया- श्रीनिवास बेलसरे
महाभारत’आणि ‘रामायण’ ही दोन महाकाव्ये म्हणजे भारताचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, भावनिक पायाच आहेत. या देशाचे जे मूळ व्यक्तिमत्त्व आहे, ज्याला खरा भारत म्हणता येईल त्याची जडण-घडण या दोन महाकाव्यांनी दिलेल्या संस्कारावरच झाली आहे. महामुनी वाल्मिकींनी रामायणात काहीही उणे ठेवले नाही. महाभारताबाबत तर म्हणतात ‘व्यासोच्छिष्टम जगत सर्वम’ म्हणजे जे काही भूतलावर आहे ते सगळे व्यासमुनींनी आधीच पचवले आहे. महाभारतात नाही असे, कोणतेही मानवी नाट्य जगात नाही. महाभारताचा भाग असलेल्या गीतेतील एक श्लोक नेहमी उदधृत केला जातो. ‘यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम’ (गीता ४:७)
आजची भयकारी परिस्थिती पाहून अनेकांना प्रश्न पडतो, भगवान श्रीकृष्णांना अजून किती अध:पात अभिप्रेत आहे की, ते धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी जन्म घेतील? असे कोडे पडते कारण, त्या श्लोकाचा शब्दश: अर्थ घेतलेला असतो. वास्तवात सदाचरणाचे आदर्श वारंवार समाजमनावर बिंबवण्यासाठी नियती काहीना काही सतत करत असतेच. लोक रामायण विसरून चालले होते, समाजाचा विचार, उच्चार आणि आचारातही रावणच आदर्श बनू लागला होता. तेंव्हा अचानक देशभर अघोषित कर्फ्यू लावणारी रामायण नावाची मालिका दूरदर्शनवर आलीच ना? रामानंद सागर यांनी घडवलेले ते एक अघटीतच नव्हते का? समाजमनाची इतकी पकड घेणारी दुसरी मालिका झाली नाही हा इतिहास आहे! संस्कारापासून दूर गेलेल्या नव्या पिढीवर आणि सर्वच वयोगटातील नागरिकांवर रामानंद सागर यांनी पुन्हा उदात्त संस्कार त्यांच्याही नकळत घडवून आणलेच ना! ते एकाच वेळी इतक्या मोठ्या लोकसंख्येवर इतर कोणत्याही मार्गाने कधीतरी शक्य झाले असते? ती घटना म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे ‘तदात्मानं सृजाम्यहं’च होते. त्याचा फायदा काही राजकीय शक्तींना झाला असला तरी समाजमन शुद्ध करण्याचे कामही त्या मालिकेने केले होते!
असेच एकदा मराठीतही घडले. आकाशवाणी पुणे केंद्रासाठी गदिमांनी १९५५ साली रामायणावर ‘गीतरामायण’ ही ५६ गाण्यांची धारावाही गीतमाला लिहिली. त्याकाळी दूरचित्रवाणी उपलब्ध नसल्याने या मालिकेने पुन्हा महाराष्ट्राला बांधून ठेवले होते. गदिमा आणि बाबुजींच्या त्या अवीट गोडीच्या गीतांनी अनेक पिढ्यांच्या मनात कायमचे घर केले. एका अर्थाने ती मालिकाही समाजमनाचे एक सूक्ष्म नैतिक उत्थानच होते! गदिमांनी प्रत्येक महत्त्वाच्या पात्रासाठी गाणी लिहिली. प्रभू रामाच्या तोंडी १०, सीतामाईच्या तोंडी ८, महाराजा दशरथ, राणी कौशल्या, लव-कुश, सुमंत, विश्वामित्रमुनी, रामभक्त हनुमान, इतकेच काय अगदी शुर्पणखेलाही २ गाणी मिळाली! भरताच्या तोंडचे एक सुंदर गाणे संगीतबद्ध करताना बाबुजींनी तोडी रागाचा वापर केला होता. गाण्याचे शब्द इतके भावपूर्ण होते की, ऐकताना श्रोत्यांचे डोळे ओलावत.
प्रभू रामांचा सारथी सुमंत त्यांना वनवासात घेऊन चालला आहे. भावूक झालेले नागरिक निरोप द्यायला जमले आहेत. शोकाकुल भरत अत्यंत हळवा झालेला भरत सुमंताला विनवणी करतोय की, अरे बाबा, मी एकटा मागे कसा राहू? मलाही त्यांच्याबरोबर येऊ दे. कारण ज्यावरून श्रीरामचंद्र जाताहेत तोच तर सत्पथ असणार!
‘राम चालले, तो तर सत्पथ,
थांब सुमंता, थांबवी रे रथ.’
सुमंत थांबत नाही. मग भरत राम आणि सीतेलाही विनंती करतो.
तुम्ही तरी थांबा, मला तुमची चरणधूळ कपाळावर धारण करू द्या. जे अभद्र घडले आहे, त्यातून सावरायला मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.
“थांबा रामा, थांब जानकी,
चरणधूळ द्या धरू मस्तकी.
काय घडे हे आज अकल्पित!
थांब सुमंता, थांबवी रे रथ.”
अगदी कालपर्यंत सगळी अयोध्यानगरी केवढ्या आनंदात होती की, आता रामराज्य येणार! लोक जणू एका सुखस्वप्नात रमले होते. त्यांचा आता केवढा स्वप्नभंग झाला आहे!
‘रामराज्य या पुरी यायचे,
स्वप्न लोचनी अजून कालचे.
अवचित झाले भग्न मनोरथ.
थांब सुमंता, थांबवी रे रथ.’
भरताच्या माध्यमातून गदिमा त्यांच्या दैवताला कशा उपमा देतात ते पाहण्यासारखे आहे. भरत म्हणतो, ‘रामराय हे निळ्याभोर आकाशासारखे विशालहृदयी आहेत तर, देवी सीता या प्रात:कालच्या प्रभेसारख्या उज्ज्वल. आता हे दोघेही अस्तंगत झाल्यावर आमच्या अयोध्येत १४ वर्षे केवढा अंधार दाटेल?
“गगननील हे, उषःप्रभा ही,
श्रीरघुनंदन, सीतामाई,
चौदा वर्षे का अस्तंगत?
थांब सुमंता, थांबवी रे रथ…”
माझ्यावरचे मोठ्या बंधूचे छत्र आता दूर चालले. आजची ही रात्र आता चौदा वर्षे चालणार! अनेकांना प्रभूरामाच्या विरहाने आताच मूर्च्छा येते आहे. ही नगरी चौदा वर्षे कशी सुरक्षित राहील?
‘चाैदा वर्षे छत्रहीनता,
चाैदा वर्षे रात्रच आता,
उरेल नगरी का ही मूर्च्छित?
थांब सुमंता, थांबवी रे रथ.’
भरताला आईचाही प्रचंड राग आला आहे. तो तिचा उल्लेख चक्क एकेरी नावाने करतो. ‘कुठे लपलीये ती कुटील कैकेयी?’ अशी त्याची विचारणा आहे. सगळी अयोध्या नगरी इथे जमली आहे. नागरिक रडत आहेत. आता हे दृश्य त्या दुष्ट स्त्रीला दाखवा आणि हेसुद्धा जतवा की, आमची ही अवस्था तुझ्याच कर्माने झाली आहे.
‘कुठे लपे ती दुष्ट कैकयी?
पहा म्हणावे हीन दशा ही,
अनर्थ नच हा, तुझेच चेष्टित.
थांब सुमंता, थांबवी रे रथ…’
आईने मला राजा केले पण, इकडे माझे पितृतुल्य बंधू श्रीराम आणि मातृतुल्य सीता अयोध्या सोडून जात आहेत. अयोध्या आजच हतबल झाली आहे. तिचे ‘अ – योध्या’ म्हणजे ‘जिथे कधी युद्ध होऊ शकत नाही अशी नगरी’ हे नाव व्यर्थ ठरले आहे. युद्ध न होताच ती पराजित झाली आहे.
‘करि भरताते नृप मातोश्री,
रामा मागे निघे जयश्री,
आज अयोध्या प्रथम पराजित
थांब सुमंता,थांबवी रे रथ…’
शेवटी भरत थेट रामालाच साकडे घालतो. माझे वडील मूर्च्छित झाले आहेत. अतिदु:खाने आईचीही शुद्ध हरपली आहे. अशा अवस्थेत तू त्यांना आणि आम्हाला सोडून कसा जातोस? असे विचारून रामाच्या निर्धाराची कल्पना असल्यामुळे तो लगेच म्हणतो, ‘तुमच्याशिवाय निराश्रित होणाऱ्या या नगरलाच बरोबर घ्या. आम्ही सगळेच तुमच्याबरोबर येतो.’
‘पिताहि मूर्च्छित, मूर्च्छित माता,
सोडून रामा, कोठे जाता?
सवे न्या तरी नगर निराश्रित.
थांब सुमंता, थांबावी रे रथ.’
भरताची विनवणी नाकारून राम निघून गेल्याने त्याला रडू कोसळते. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि निर्धारमूर्ती रामाचा रथ दिसेनासा होतो. त्याचे शब्द थांबतात. कापऱ्या आवाजातले त्याचे आर्जवी बोलणे कंठातच रुतते असे वर्णन गदिमा करतात.
‘ये अश्रूंचा पट डोळ्यांवर,
कोठे रथ तो? कोठे रघुवर,
गळ्यांत रुतली वाणी कंपित.
थांब सुमंता, थांबवी रे रथ.’
कसले हे जुने कवी, कसले हे संगीतकार आणि कसले हे बंधूप्रेम!