कथा- रमेश तांबे
मुंबईतील परेल विभागातील एका मोठ्या शाळेत शिकत होतो. तेव्हा आमची शाळा अभ्यासासोबतच कडक शिस्तीची म्हणून प्रसिद्ध होती. शाळेतल्या अनेक शिक्षकांना विद्यार्थी तसे घाबरूनच असायचे. त्यापैकी टिळक सर एक! टिळक सर काहीसे बुटके असले तरी त्यांचा दरारा विद्यार्थी वर्गावर खूपच होता. मी त्यावेळी आठवी-नववीत असेल टिळक सर आम्हाला भूगोल शिकवायचे. या गोष्टीला ३५ वर्षांहून अधिक काळ लोटला असेल. पण टिळक सरांची वामन मूर्ती अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तराळते आहे. खरे तर शिकवण्यापेक्षा त्यांनी केलेल्या शिक्षांमुळे माझ्या अजूनही ते चांगलेच लक्षात आहेत.
मला चांगलेच आठवते आहे. मी वर्गात गॅलरीच्या बाजूच्या खिडकीत बसायचो पाचव्या बेंचवर! माझ्यामागे महाजन नावाचा एक वात्रट मुलगा बसायचा. महाजन माझ्या खोड्या काढायचा आणि टिळक सर मला शिक्षा करायचे. असे कितीतरी वेळा घडायचं. मग सर वर्गावर असोत वा नसोत. एकदा असेच झाले. एक तासिका संपून गेली होती. दुसरे सर वर्गावर यायचे होते. महाजन नेहमीप्रमाणे मला मागून चिमटे काढू लागला. मला असह्य झाल्याने उठून मी त्याच्याशी झटापट करू लागलो. पण माझ्या दुर्दैवाने तेवढ्यात टिळक सर खिडकीत उभे! उद्या तुम्ही दोघांनी भूगोलाचा आठवा धडा दहा वेळा लिहून आणायचा. एक मोठे काम माझ्या मागे त्यांनी लावून दिले. घरी जाऊन मी रात्रभर तो धडा अगदी व्यवस्थित दहा वेळा लिहून काढला. अन् ती वही घेऊन दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. टिळक सर त्यांच्या तासाला वर्गात येण्यापूर्वी महाजनने मला धमकीच दिली होती; काल शिक्षा कुणाला केली होती असे विचारल्यावर उभे राहायचे नाही. नाहीतर माझ्याशी गाठ आहे. आता मात्र माझे अवसानच गळाले. खरे तर मी उभे न राहण्याचे काहीच कारण नव्हते. कारण रात्रभर जागून मी धडा दहा वेळा लिहून काढला होता. पण आता हे महाजन नावाचे संकट परत माझ्या मानगुटीवर बसले. आता काय करावे हा विचार करत असतानाच सर वर्गात आले.
सरांनी नेहमीच्याच सवयीप्रमाणे हातातले पुस्तक टेबलवर ठेवले. डस्टरने फळा पुसला आणि साऱ्या वर्गाला उद्देशून म्हणाले,” काल मी ज्यांना शिक्षा केल्या होत्या त्यांनी उभे राहावे.” महाजनने माझ्या पाठीला पेन्सिलचे टोक लावूनच ठेवले होते. मला तर महाजन तलवार घेऊनच उभा आहे असे वाटत होता. त्यामुळे उभे राहण्याचे धाडस मला झालेच नाही. खरंतर संपूर्ण वर्गात कोणीच उभे राहिले नाही. तशा अनेक जणांना सरांनी काल शिक्षा केलेल्या होत्या. पण काय आश्चर्य; सरांनी सरळ शिकवायला सुरुवात केली. मी मागे वळून बघितले तेव्हा माझ्या बावळटपणाला महाजन फिदीफदी हसत होता. एका क्षणात माझी रात्रभर जागून केलेली मेहनत वाया गेली. महाजनने मस्ती केली, त्याच्यामुळे मला आणि त्यालाही शिक्षा झाली. पण तो बेफिकीर, बिनधास्त राहिला. महाजनने धडा दहा वेळा लिहिण्याचा प्रश्नच नव्हता, साधा एक शब्द त्याने लिहिला असे तर शपथ! पण मी मात्र नाहक सगळी शिक्षा भोगली. त्रास मला झाला होता. शिवाय शिक्षा पूर्ण केल्याचे समाधानसुद्धा महाजनने मला मिळू दिले नाही. तीन वर्षांच्या कालावधीत केवळ एकट्या महाजनमुळे कितीतरी वेळा मला शिक्षा झाल्या. कधी पाठीत धपाटे, तर कधी हातपाय पट्टीने सडकून निघायचे. कधी वर्गाबाहेर उभे राहा, तर कधी बाकड्यावर!
कधी आई-बाबांना शाळेत न्यावे लागले, तर कधी शंभर रुपयांपर्यंतचा दंडही भरावा लागला. हे शिक्षा प्रकरण माझ्या शालेय जीवनातील एक गंभीर गोष्ट बनून गेली. आता आपला पोरगा हातचा जातो की काय या भीतीने आईचा बेदम मारदेखील अनेकवेळा खाल्ला. या सर्व शिक्षा प्रकरणामुळे माझा आत्मविश्वासाला मात्र तडा गेला तो कायमचाच. मी शाळेत जायला, कोणाशी बोलायला घाबरू लागलो. त्यामुळे शाळेतल्या सर्वच गोष्टीत मी मागे पडू लागलो. अभ्यास, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यात शेवटच्या बेंचवरचा वा शेवटच्या खुर्चीवरचा केवळ एक प्रेक्षक बनून राहिलो. माझा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळून गेला होता. त्याचे प्रतिबिंब माझ्या दहावीच्या निकालात मलाच नव्हे तर सगळ्यांनाच दिसले!
तात्पर्य : शिक्षा प्रकरणाने मला मात्र एक चांगली शिकवण दिली. ती म्हणजे माणसाने अतिसरळ असू नये. कारण जंगलातसुद्धा सरळ झाडे सगळ्यात आधी कापली जातात!