नाशिक : गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर (Godavari Flood 2024) आला आहे. पावसाने घेतलेल्या २० दिवसांच्या विश्रांतीनंतर गोदावरी दुथडी भरून वाहतेय. गोदावरीला २०२४ वर्षाच्या मोसमातील पहिला पूर दि. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी आला होता. त्यानंतर २४ ऑगस्टला मात्र दुसरा पूर आला असून पूरस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम तशीच आहे. तर, जिल्ह्यामधील १० धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्याभरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची (Nashik Rain Update) संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कायमअसल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी सकाळपासून गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. टप्पाटप्प्याने विसर्गात वाढ करून सायंकाळी ८ हजार ४२८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून तो आताही कायम आहे.
दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
गोदा काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे. नदी काठावरील छोटे पूलसुद्धा पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे असं म्हणण्यात आलं आहे .
जिल्ह्यातील १० धरणांमधून विसर्ग सुरु
सध्या नाशिक, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह, सुरगाणा अन्य तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यामी,मध्ये १० धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ८ हजार ४२८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे, दारणातून १४ हजार ८१३२ क्यूसेक, भाम धरणातून २ हजार ९९०, भावलीतून ७०१ क्यूसेक, वालदेवीतून १०७, गौतमी गोदावरीतून १ हजार ५३६, कडवातून ५ हजार ६२६, आळंदीतून ८० क्युसेक, भोजापूर धरणांतून १ हजार ५२४ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे तर नांदूरमध्यमेश्वरमधून ३९ हजार २ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.