विशेष – भालचंद्र ठोंबरे
पुराणातील मान्यतेनुसार दिती ही कश्यप ऋषींच्या अनेक पत्नींपैकी एक पत्नी आहे. तिच्या पोटी असुरांचा जन्म झाला. सर्वात ज्येष्ठ असूर वज्रांग याचे शरीर नावाप्रमाणेच विशाल, धडधाकट व सामर्थ्यवान होते. याने इंद्र लोकांवर स्वारी करून इंद्राला कैद केले, परंतु विष्णू भगवान, ब्रह्मदेव व पिता कश्यप यांच्या विनंतीवरून इंद्राला मुक्त केले. त्यामुळे ब्रह्मदेवांनी एक सुंदर कन्या निर्माण करून तिचा वज्रांगाशी विवाह लावून दिला. वज्रांगाच्या पत्नीने तिन्ही लोकांवर राज्य करेल अशा पराक्रमी पुत्राची कामना वज्रंगाजवळ व्यक्त केली. त्याप्रमाणे वज्रांग व त्याची पत्नी दोघेही तप करू लागले. तपश्चर्यानंतर त्यांना पुत्र झाला. त्याच्या जन्माच्या वेळी आकाशात मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट झाला. म्हणून मुलाचे नाव तारका ठेवण्यात आले. हाच पुढे तारकासुर म्हणून प्रसिद्ध झाला.
तारकासुराने महादेवाची घोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले. महादेवाने तारकासूरास वर मागण्यास सांगितले. तारकासूराने अमरत्वाचा वर मागितला; परंतु ते देणे शक्य नसल्याने त्याला दुसरा वर मागण्यास सांगितले. त्यावेळेला आपला मृत्यू तुमच्या (शिवाच्या) पुत्राच्याच हातून व्हावा, अशी मागणी त्याने केली, कारण त्यावेळेस शिव सतीच्या निधनाने वैराग्यवस्थेत तपाचरण करत होते. त्यामुळे त्यांना पुत्र नव्हता व त्यावेळेस संभवही नव्हता. म्हणून अशाप्रकारे तारकासूराने वेगळ्या मार्गाने अमरत्व मागण्याचा प्रयत्न केला. महादेवाने तथास्तु म्हटले. आता आपण अमर झालो, या विचाराने तारकासुर अतिशय खूश व क्रूर झाला. त्याने तिन्ही लोकांवर स्वारी करून त्यावर आपले अधिपत्य स्थापित केले. देवांनाही आपले दास करून घेतले. यामुळे सर्वजण त्रस्त झाले. ते सर्व ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने यात आपण काहीही करू शकत नाही, केवळ शिवाचा पुत्रच त्याचा वध करू शकेल असे सांगितले. मात्र शिव त्यावेळेला वैराग्यवस्थेत ध्यानधारणेत असल्यामुळे ते विवाह कसा करणार आणि विवाहच नाही तर, पुत्र कसा होणार? या विवंचनेत सर्व देव पडले. तेव्हा त्यांनी कामदेवाला शिवाची ध्यानधारणा भंग करण्याची आज्ञा केली. कामदेवाने मदनबाण मारून शिवाची ध्यानधारणा भंग केली. ध्यानधारणा भंग झाल्यामुळे शिवाने तिसरा नेत्र उघडून कामदेवाला भस्म केले. याचवेळी हिमालयाची पुत्री पार्वती ही शिवाशी विवाह करण्याच्या इच्छेने तपाचरण करत होती. अखेर त्याला यश येऊन शिवपार्वती विवाह संपन्न झाला.
शिवपार्वतीचा पुत्र देवांचा तारणहार ठरणार असल्याने इंद्राने शिवपार्वतीच्या संरक्षणासाठी पाच देवांची नेमणूक कैलासावर केली. शिव पार्वतीचा विवाह झाला हे कळताच तारकासूरानेही त्यांच्यावर लक्ष ठेवले. बाळाच्या जन्माच्या वेळेस बाळाचा जन्म होताच तारकासूराने पार्वतीच्या दाईचे रूप घेऊन त्या बालकाला पळविले व शिखरावरून खाली फेकून दिले. परंतु कैलासाचे रक्षण करणाऱ्या पाच देवांपैकी अग्नी देवाने त्याला वाचविले व त्याला सांभाळण्यास गंगेला दिले. हे बाळ भुकेसाठी रडू लागले त्या वेळेला गंगेने कृतिकांना (कृतिका नक्षत्रातील सहा तारका) बोलावून त्यांच्याद्वारे बाळाला स्तनपान करविले.
बाळाच्या हरविण्याने शिवपार्वती अस्वस्थ झाले व सर्व देव गण त्या शोधासाठी निघाले. तेव्हा गंगेकडून त्यांना त्या बाळाची माहिती मिळाली. आणि त्याला घेऊन ते शिवपार्वतीकडे आले. कार्तिकेय पाच ते सहा वर्षांचा होताच त्याला देवांनी आपला सेनापती केले. कार्तिकेयच्या नेतृत्त्वात देव आणि दानवांची तारकासुराशी युद्ध होऊन कार्तिकेयने तारकासूराचा वध केला.
तारकासुर शिवभक्त होता. एका शिवभक्ताला मारण्याच्या कारणाने कार्तिकेय अस्वस्थ होते. त्यामुळे जिथे युद्ध झाले त्या ठिकाणी त्यांनी तीन शिवलिंग स्थापित केले असे मानण्यात येते. ज्या ठिकाणी तारकासूराला मारण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी प्रतिज्ञेश्वर, ज्या ठिकाणी कार्तिकेयने फेकलेली शक्ती तारकासूराच्या डोक्यावर पडली तेथे कपालेश्वर, व ज्या ठिकाणी तारकासूराचे शव पडले तेथे कुमारेश्वर अशी तीन शिवलिंगे निर्माण केली अशी समजूत आहे. हे स्थान अलीगड जिल्ह्यात अलीगडपासून अंदाजे २० किलोमीटर अंतरावर अलीगड-मथूरा मार्गावर सहारा खुर्द येथे असलेल्या एका शिवमंदिरात असल्याचे सांगण्यात येते.