राखावया पर्यावरण
हाती घेऊया वनीकरण
झाडावरील घाव आपला
आपल्याच ऱ्हासाचे कारण
पर्यावरणाची नासाडी होता
बिघडत जाईल जीवनमान
वनावनांचा नाश होता
संकटात येईल जीवनरान
निसर्गाचा अवमान करता
वाढत जाईल उष्णतामान
पाहता पाहता घटत जाईल
पृथ्वीवरील पर्जन्यमान
म्हणूनच वाटे, झाडे लावू
रोखू चला हे वायू प्रदूषण
रोपवाटिका प्रकल्प घेऊन
साधत जाऊ मृद्संधारण
प्लास्टिकचा वापर थांबवू
हिरवाईला देऊ साथ
आता तरी होऊ शहाणे
झाडांचा घेऊ हातात हात
वृक्ष आपुले सगेसोयरे
ध्यानी ठेवू हे जीवनगान
जीवनगाण्यात वसुंधरेचा
हिरवा शालू सुंदर छान !
काव्यकोडी- एकनाथ आव्हाड
१) दातातील कीड
बरी करतो
अन्न टिकवायला
उपयोगी पडतो
सागरापासून थेट
येतो हा घरात
मसाल्याचा राजा
कोणास म्हणतात?
२) दिसायला वरून
असतात काळी
खाल्ल्यावर जीभ मात्र
करतात जांभळी
खाल्ल्यावर अंगी
येते बळ
पावसाळ्यातील कोणते
हे अमृतफळ?
३) पांढरा पांढरा रंग
लांब आखूड अंग
जेवताना कच्चाच
खाऊन होती दंग
शेंगेला त्याच्या
डिंगरी म्हणतात
कुणाच्या पानांची
भाजी छान करतात?
उत्तर –
१) मीठ
२) जांभूळ
३) मुळा