प्रतिभारंग- प्रा. प्रतिभा सराफ
टळटळीत दुपारी जेव्हा माझी बहीण आणि आमच्या इतर मैत्रिणी घराबाहेर गोट्या खेळायच्या तेव्हा केवळ मला ऊन सहन व्हायचे नाही म्हणून मी घरातच काहीतरी करण्याचा उद्योग करायचे. ‘आई आणि बाळ’ यांची चित्रे काढायला सुरुवात केली. आई आणि बाळ एकत्रितपणे कधी वर्तमानपत्रात, कधी मासिकात दिसायचे ते बघून बघून मी काढायचे आणि चक्क तीस दिवसांत मी तीस चित्रे काढली. विषय एकच असला तरी प्रत्येक चित्र वेगळे होते. शेवटची दोन-तीन चित्रे तर मी अगदी स्वतःच्या मनाने काढू शकले. ती वही मी कायमची जपून ठेवली आहे. तेव्हा कदाचित मी चौथीत होते. त्यामुळे ‘मानसिक आनंद’ किंवा ‘मेडिटेशन’ किंवा ‘टेंशन रिलिज’ असे काही शब्द खिजगणतीतच नव्हते. अशा सकारात्मक उद्देशाने मी माझा छंद जोपासलेला नव्हता. इतकेच काय तर छंद म्हणजे काय? हेही कळण्याचे ते वय नव्हते.
त्याच्या पुढच्या वर्षी मी माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीकडे गणपतीसाठी गेले; तर गौरीपुढे तिने मण्यांची खेळणी मांडली होती. ती खेळणी मला खूप आवडली. मी तिला सहज म्हटले,
‘ही कोणी केली आहेत?’
तर ती म्हणाली,
‘माझ्या मोठ्या बहिणीने.’
ती आमच्या शेजारीच बसली होती म्हणून मी लगेच तिला विचारले,
‘तू मला शिकवशील का?
तर तिने लगेच होकार दिला. इतकेच नव्हे तर त्याच दिवशी तिने घरातले काही मोती आणि तंगूस घेऊन शिकवायला सुरुवातही केली. त्यानंतर एक दिवस तिच्याकडे जाऊन तिच्यासोबत बसून मी एक खेळणे शिकले आणि मला इतर खेळणी कशी बनवायची याचा अंदाज आला. त्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्याकडून संपूर्ण खेळणीचा सेट मी घेऊन आले आणि महिनाभरात मण्यांची बाहुली, बदक, हत्ती, उंट, जिराफ, मोर, पोपट, तुळशी वृंदावन अशा खूप वस्तू बनवल्या. माझ्या शोकेसमध्ये त्या फार सुंदर रचून ठेवल्या. आमच्याकडे कोणी पाहुणे आले की, त्याचे खूप कौतुक व्हायचे. आताही माझ्या आईची शोकेस त्याने सजलेली आहे. मी ही मण्यांची खेळणी माझ्या इतर मैत्रिणींनाही बनवायची शिकवले!
त्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी वायरच्या पिशव्या बनवायचे शिकले. भाजीच्या पिशवीपासून पर्सपर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या अनेकविध पिशव्या मी बनवल्या. एका वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणींच्या बाहुल्यांचे सुंदर सुंदर फ्रॉक शिवून दिले. मग मला व्यसनच लागले की, प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी कोणता नि कोणता प्रोजेक्ट हातात घ्यायचे.
एका वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही आई-बाबांबरोबर अजिंठा-वेरूळ इथे फिरायला गेलो होतो, तर तिकडच्या नदीकाठी आम्हाला खूप सारे शंख आणि दगडं मिळाली. ही दगडं वेगळी होती. त्याच्यावर काही क्रिस्टल होते. काही दगडांवर छोटे-छोटे खड्डे होते त्या खड्ड्याच्या आत पांढरा-हिरवा-लाल असे कितीतरी चमकणारे रंग होते. त्या दगडांनी आमची बॅग खूप जड झाली. ती बॅग आईलाच उचलावी लागली कारण आम्ही लहान होतो. दगडांचे वजन पेलवण्यासारखे नव्हते. त्याबद्दल आईने खूप कटकट केली पण माझ्या हट्टापुढे तिनेही ती घरापर्यंत आणली. त्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आमच्या व्हरंड्यात संपूर्ण अंधार करून हे सगळे दगडं-शंख-शिंपले मांडले. कशाच्या पुढे दिवे, कशाच्या पुढे मेणबत्ती लावून एक प्रदर्शन भरवले. त्या प्रदर्शनाची फी ठेवली पाच पैसे. माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा इतकेच काय तर उन्हाळ्याच्या सुट्टीत यांच्या घरी आलेले पाहुणेसुद्धा माझ्या प्रदर्शनाला भेट देऊन गेले. खूप कौतुक करून गेले.
इथे मला खरंच सांगायला आवडेल की, या सगळ्या गोष्टींना ‘छंद’ म्हणतात. छंदातून आपल्याला काही मिळते, याचा अजूनही गंध नव्हता. पण या सगळ्या कृतीतून मला खूप आनंद मिळायचा. आता हे आठवले तरी मला तो आनंद अनुभवता येतो. या सर्वच छंदातून मी खूप काही शिकले, समृद्ध झाले. आणि एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की, या छंदासाठी लागणारे सर्व साहित्य म्हणजे वही, रंगपेटी, ब्रश, तंगूस, मणी, वायरी, विविध प्रकारच्या सुया इत्यादी शेवटी आई-वडिलांनीच आणून दिल्या असणार ना! शिवाय प्रत्येक कृतीनंतर कौतुकही झाले असेल, त्यामुळेच मी हे सगळे छंद जोपासू शकले!
आज मी जेव्हा आयुष्याकडे वळून पाहते तेव्हा लक्षात येते की, माणसाला कोणत्या तरी छंदाची आवश्यकता असतेच! ते कधीच एकाकीपण येऊ देत नाहीत. कायम हात देतात. उभे करतात. आत्मविश्वास देतात, प्रसिद्धी देतात आणि कधी भरघोस पैसाही मिळवून देतात!
या लेखाच्या निमित्ताने मला मनापासून सांगावेसे वाटते की, ‘छंद कधी कधी माणसाला एक नवे कोरे आयुष्यही मिळवून देतात!’
pratibha.saraph@ gmail.com