कथा- प्रा. देवबा पाटील
जयश्रीचा अभ्यास झाल्यावर ती तिच्या आईजवळ गेली. तिने आपल्या आईला प्रश्न विचारणे सुरू केले.
“आई लचक कशी भरते गं?” ‘‘जयश्रीने विचारले.’’
“खेळतांना किंवा एखादी जड वस्तू उचलताना लचक भरते. लचक ही शरीरातील सांध्याला झालेली इजा असते. सहसा ती गुडघ्यात, पायाच्या घोट्यात किंवा हाताच्या मनगटात उद्भवते. लचक भरणे म्हणजे त्या सांध्यातील स्नायू व अस्थिबंधने ताणली जाणे. लचक भरल्याने ते स्नायू व अस्थिबंधने दुखतात. अशावेळी सांध्यावर सूज येते. कमी लचक भरल्यास ती सूज गरम शेक दिल्याने वा एखादे वेदनाशामक औषध लावून हळुवार हाताने चोळल्याने कमी होते व थोड्याच वेळात वेदनाही कमी होतात; परंतु जास्त सूज आल्यास डॉक्टरला दाखवणेच योग्य असते. कारण जास्त लचक भरल्यास तेथील अस्थिबंधने तुटूसुद्धा शकतात.” ‘‘आईने सांगितले.’’
“ए आई, डोळ्यांवर कापडाची पट्टी बांधल्यावर आपण गोल गोल का फिरतो?” ‘‘जयश्रीने प्रश्न केला.’’
“त्याचे असे आहे बाळा,” “आई सांगू लागली,” “आपल्या शरीराची रचना असमान आहे म्हणजे शरीराच्या डाव्या व उजव्या बाजू या जशाच्या तशा तंतोतंत सारख्या नाहीत. आपले हृदय डावीकडे आहे, तर यकृत हे उजवीकडे आहे. पाठीचा कणा हा सुद्धा परिपूर्णतेने सरळ नाही. आपले पाय व मांड्या या सुद्धा तंतोतंत सारख्या नाहीत. त्यामुळे आपल्या शरीराच्या दोन्ही बाजूंमध्ये समतोलपणा नाही. या असमतोलाचा परिणाम आपल्या चालण्यावर होतो. आपण जेव्हा डोळे बंद करून चालतो किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून चालतो तेव्हा आपल्या चालीवर आपल्या स्नायूंचे व शरीराच्या रचनेचे नियंत्रण असते. त्यात असमतोल असल्याने एक बाजू आपोआप एका विशिष्ट दिशेला वळते नि आपण गोल गोल फिरतो. म्हणूनच डोळे सताड उघडे ठेवूनच कोणतेही वाहन चालवावे. किंचितशीही डुलकी येत असल्यास कोणतेही वाहन मुळीच चालवू नये.”
“आपणास भोवळ कशी येते आई?” “जयश्रीने शंका काढलीच.”
“भोवळ येण्याची अनेक कारणे असतात छकुली,” आई म्हणाली.” “तीव्र भूक, खूप थकवा, अतिशय वेदना, काही कारणामुळे अचानक भावनिक धक्का बसणे इ. कारणांमुळे माणसाला भोवळ येते. कोणत्याही कारणामुळे जेव्हा आपल्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, जो होतो तो खूपच अपुरा ठरतो. त्यावेळी माणसाला भोवळ येते. भोवळ येण्यालाच चक्कर येणे असे सुद्धा म्हणतात. भोवळ आल्यास त्या व्यक्तीला स्वस्थ आडवे झोपायला लावावे. त्याचे डोके खाली करावे व पाय थोडेसे वर उचलावेत. खाली झोपणे शक्य नसेल, तर ओणवे व्हायला सांगावे व गुडघ्यांमध्ये डोके धरून राहायला सांगावे. अशा क्रियांनी मेंदूला नीट व पुरेसा रक्तपुरवठा होतो व चक्कर येणे कमी होते; परंतु एवढे करून जर चक्कर येणे थांबली नाही तर मात्र डॉक्टरचा सल्ला घ्यावा.”
“ बरे आई, आपण खाली कसे काय पडतो गं?” “जयश्रीने आईला प्रश्न केला.”
“आपल्या डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या बरोबर मध्यभागातून जाणाऱ्या सरळ रेषेस आपल्या शरीराची गुरुत्वरेखा किंवा गुरुत्वमध्य म्हणतात. त्या रेषेच्या मध्यावरील बिंदूला आपल्या शरीराचा गुरुत्वबिंदू किंवा गुरुत्वकेंद्र म्हणतात. या मध्यबिंदूवर आपले शरीर तोलून धरलेले असते. शरीराचा तोल गेला की, शरीराच्या मध्यावरून जाणाऱ्या त्या मध्यरेषेचा केंद्रबिंदू सुटतो म्हणजे ढळतो, त्याची जागा किंचितशी बदलते. त्यामुळे आपला तोल आणखी जास्त जातो व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने आपले शरीर खाली पडते.” “आईने खुलासा केला.”
“ आपण मागे डोंबारणीचा खेळ बघितलेला आठवतो का तुला?” “आईने जयश्रीला विचारले.”
“हो आई, ती डोंबारीण कशी त्या दोरीवरून न भिता, खाली न पडता चालत होती,” “ जयश्री म्हणाली.”
“डोंबारीण दोरीवरून चालताना शरीराचा हा केंद्रबिंदू स्थिर राहावा म्हणूनच तर आपल्या खांद्यांवर आडवी काठी किंवा बांबू घेत असते. त्या काठीची किंचितशी खाली वर अशी सुयोग्य हालचाल करून ती शरीराचा गुरुत्वबिंदू स्थिर राखते व आपला तोल सांभाळते. म्हणून ती दोरीवरून खाली पडत नाही. असाच माणसाने जीवनात प्रत्येक वेळी आपला तोल सांभाळला पाहिजे,” “आई म्हणाली.”
“हो आई,” ‘‘जयश्री उत्तरली.’’