Wednesday, March 19, 2025

बारबाला…

क्राइम अ‍ॅड. रिया करंजकर

शहरामध्ये अनेक ठिकाणी बार, रेस्टॉरंटमध्ये जेवण देणे, स्टेजवर गाण्यांवर नृत्य सादरीकरण करणे अशी विविध कामे महिला करत असतात. आवड म्हणून या पेशाकडे कोणी मनापासून वळत नाही, तर काही मुलींची मजबुरी असते म्हणून ते या पेशाकडे वळतात. लहान वयातच त्यांच्यावर कुटुंबाचा आलेला भार असो किंवा काही मुली मुलांच्या फसव्या प्रेमाला फसून गावातून शहराकडे आलेल्या असतात. त्यामुळे त्यांचे वागणे, बोलणे हे वेगळ्याच पद्धतीचे असते. या बारबालांचे आयुष्य कधी सरळ-सोपे नसते.

श्रद्धा त्यांपैकी एक होती. लहानपणातच वडील गेल्यामुळे श्रद्धावर साऱ्या घराची जबाबदारी आली होती. श्रद्धाच्या मागे चार भाऊ होते. त्यामुळे साहजिकच घराची जबाबदारी तिच्यावर होती. आई अशिक्षित असल्यामुळे आई चार मुलांना संभाळणार की कामावर जाणार हा प्रश्न होता. त्यामुळे श्रद्धाने आपल्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेऊन घराची जबाबदारी स्वीकारली. पण त्या वयात शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी कोण देणार म्हणून ओळखीच्याच व्यक्तीने बारमध्ये कामाला लावले. पहिल्यांदा ती दारू सर्व्ह करणे, छोटी-मोठी कामे ती करत असे. श्रद्धा बारमध्ये राहून नृत्य शिकणे आणि स्टेजवर गाण्यावर थिरकू लागली. तिच्या येणाऱ्या कमाईतून ती आपल्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करू लागली. मला शिकता आले नाही, पण माझी भावंडे शिकली पाहिजेत. चांगल्या मार्गाला लागली पाहिजे. हा विचार ती करू लागली. भावंडे शिकून चांगल्या कामालाही लागली. तिलाही कुठेतरी वाटू लागले की, आपण जे काम करतोय ते आपल्याला सोडायला पाहिजे. तिची भावंडेही तिला बोलू लागली की, हे आता काम सोड. आता आम्ही चांगल्या प्रकारे कमवत आहोत. पण अशातच श्रद्धाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. उद्या भावंड आपल्याला बघतील की नाही, त्यांनी आपल्याकडे लक्ष नाही दिले, तर आपण काय करायचे, म्हणून तिने आपल्या भावांचे न ऐकता बारमध्येच काम सुरू ठेवले. भावंडांची लग्न झाल्यावर तिलाही कुठेतरी मनात वाटले की, आपलाही संसार असावा. आपलीही मुले असावीत.

अशातच तिची ओळख बारमध्ये येणाऱ्या यशवंतबरोबर झाली. ती पहिल्यापासूनच त्याला ओळखत होती. काही अडीअडचणीला यशवंत तिला मदत करत होता. यशवंतच्या मदत करणाऱ्या आणि माणुसकीच्या स्वभावाला श्रद्धा त्याच्या प्रेमात पडली. त्याच्याशी तिने लग्न केले. लग्न झाल्यानंतरही तिने बारमधले काम सोडले नव्हते. कारण एवढ्या वर्षांत बारमध्ये काम करून तिच्या हातात रात्रंदिवस पैसा खेळत होता. त्यामुळे तिला आता एक प्रकारची सवय झालेली होती. श्रद्धाकडे पैसा येत असल्यामुळे यशवंत आळशी बनत चालला होता. परिस्थिती उलट झाली होती की, श्रद्धाच आता यशवंतला पोसत होती. यातच श्रद्धा, यशवंतला एक मुलगा आणि मुलगी झाली. मुले मोठी होऊ लागली. खर्च वाढू लागले तरीही तिने आपले बारला जाणे सोडले नाही. त्याचवेळी श्रद्धाला समजले की, यशवंतचे लग्न झालेले होते आणि त्याची बायको गावाकडे होती. त्यांना एक मुलगाही होता. या गोष्टीचा श्रद्धाला धक्का बसला. आपण एवढी वर्षे संसार करतोय आणि या गोष्टीची आपल्याला खबरही लागू दिली नाही.
अधून मधून तो गावाला जायचा पण जास्त दिवस राहत नव्हता. त्याच्यामुळे कधी श्रद्धाने यशवंतवर संशय घेतला नाही. ज्यावेळी श्रद्धाला हे समजले त्यावेळी यशवंतने आपले पहिले लग्न झाले असल्याचे कबूल केले. श्रद्धाला तेव्हा समजले की, आपण यशवंतशी केलेले लग्न कायदेशीर लग्न नाहीय. म्हणून तिने कायदेशीर सल्ला घेण्याचे ठरवले. त्यासाठी तिने यशवंतला नोटीस पाठवली की, आजपर्यंत तिने जो त्याच्यावर खर्च केलेला आहे तो त्याने परत द्यावा. श्रद्धाने ३० लाखांपर्यंत खर्च मागितला होता. कारण तिच्याकडे दोन मुलांची जबाबदारी होती. जर ३० लाख द्यायचे नसतील, तर त्याने कायमस्वरूपी श्रद्धासोबत राहावे आणि पहिल्या पत्नीला सोडावे.

नाही तर, तीस लाख रुपये श्रद्धाला देऊन तिला सोडून त्याने कायमस्वरूपी पहिल्या पत्नीकडे राहावे. यामध्ये तिचे म्हणणे असे होते की, दोन्ही बायकांची फसवणूक नको तसेच मुलांची देखील फसवणूक नको त्यामुळे यशवंतने कायदेशीर निर्णय घ्यावा. तिला हे कळून चुकले होते की, आपल्या मुलांना पुढे वडिलांचा कायदेशीर अधिकार प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळे गावातही या मुलांना कायदेशीर मुले म्हणून मान्यता मिळणार नाही. आपल्यानंतर मुलांचे काय होईल ही चिंता तिच्या मनात घोळत होती. तिला अगोदर यशवंतबद्दल फार अभिमान होता. कारण बारवाल्या मुलींची लग्न करायला कोणीही तयार नसतं, पण यशवंतचा स्वभाव, माणुसकी बघून तिने त्याच्याशी लग्न केले होते आणि त्याच माणसाने तिला फसवले.

अशाच पद्धतीच्या अनेक समस्या बारमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या नशिबी आलेल्या असतात. अनेक बारबाला अशा आहेत की, त्यांच्याशी लग्न मात्र लोक करतात, पण कायदेशीर पत्नी म्हणून कधीच स्वीकार करत नाहीत. त्यामुळे श्रद्धाने कायदेशीर पद्धतीने सर्व निर्णय घेण्याचे ठरविले होते. अनेक बारबाला अशा आहेत की, त्यांना समाजातून कायमच तुच्छतेची वागणूक मिळत असते. त्यामुळे त्यांना कोणी तरी प्रेम करणारा मिळाला की, ते त्याच्याशी लग्न करून मोकळे होतात आणि इथे त्यांच्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळते. स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रोजेक्टस बारबाला आपल्याला भेटतात.
(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -