आडाळी – मोरगावचा – देव म्हातारबाबा

Share

कोकणी बाणा- सतीश पाटणकर

देवस्थान  भक्तांच्या नवसाला पावन होते, जेथे मनातून केलेला संकल्प पूर्णत्वास जातो, त्या देवस्थानाला  जागृत देवस्थान  म्हणतात. थोडक्यात सांगतो तुमची ज्या देवतेवर अपार श्रद्धा आहे असे प्रत्येक देवस्थान जागृत  आहे. कधी कधी तिथले देव स्वप्न, ध्यान किंवा अन्यवेळी भक्तांना दर्शन, दृष्टांत देऊन तेथील दिव्यत्वाची प्रचिती देते. अशा स्थानांना जागृत म्हणजेच जिवंत आहे असे समजले जाते. बांद्यापासून अवघ्या १० ते १२ किमीवर असलेले श्रीदेव म्हातारबाबा हे ठिकाण संपूर्ण बांदा पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. साधारणत: दोनशे वर्षांपूर्वीचे हे देवस्थान.

बांदा या गावातून घारपी, फुकेरी, कोलझर, उगाडे, तळकट, शिरवल, झोळंबे यांसारख्या अतिदुर्गम गावात जाण्याची ही पायवाट. फार फार तर बैलगाडीने प्रवास. संपूर्ण पायवाट घनदाट जंगलातून जाणारी. त्यामुळे या रस्त्यावर मदत किंवा सोबतीसाठी चिटपाखरूही नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणावरून प्रवास करताना येथील एका जागेवर थांबून खडे टाकून देवाला मदतीसाठी हाक मारण्याची प्रथा रूढ होती. कालांतराने हा कच्चा रस्ता झाल्यामुळे खडे टाकण्याची प्रथा मागे पडली व त्या ठिकाणी चिरूट किंवा चिलीम (विडी) ठेवण्याची प्रथा सुरू झाली. एखादी वयस्कर व्यक्ती ही चिरूट त्या काळी ओढत असे असा एक समज होता. हा भाग आता श्रीदेव म्हातारबाबा स्टॉप म्हणून प्रसिद्ध आहे.

बांदा येथील एक वाटसरू १९५४ मध्ये रात्रीच्या वेळी याच वाटेने आपल्या मूळ घरी जात असताना या निर्जन जंगलातून पुढे जायचा त्यांना धीर होईना. त्या वेळी या रूढ असलेल्या प्रथेप्रमाणे क्षणभर त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी विनंती केली की, आपणास मदत कर. असे सांगून ते पुढे गेले तोच समोरून डोक्यावर फटकूर असलेला, हातात कंदील व दांडा धरलेली व्यक्ती येताना दिसली. त्याने या वाटसरूला त्याच्या घरापर्यंत सोबत केली. त्याच्या घरी वडीलधारी माणसाने विचारले की, तू कोणाबरोबर आलास? तेव्हा तो म्हणाला, ‘मला एका व्यक्तीने सोबत केली व येथपर्यंत आणून सोडले. तेव्हा वडीलधारी म्हणाला, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून म्हातारबाबा आहे.

रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी अशी अदृश्यरूपी शक्ती सर्वांच्या मदतीला येते. त्यासाठी काहीतरी करायला हवे अशा प्रेरणेने प्रेरित होऊन याच सद्गृहस्थाने १९६० साली त्या ठिकाणी घुमटी बांधण्याचा निर्णय घेतला; परंतु दुसऱ्याच्या जमिनीत ही घुमटी कशी बांधायची असा प्रश्न आला. मात्र जमीन मालकाने स्वत:च तेथे घुमटी बांधण्याचा प्रस्ताव मान्य केला व घुमटी बांधली गेली. ही सर्व जागा नाथांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे.

या घुमटीपासून काही अंतरावर ब्राह्मणाचे स्थळ आहे. या ठिकाणी दोन पाण्याचे झरे आहेत. उन्हाळी व पावसाळी या नावाने ते ओळखले जातात. उन्हाळ्यात या झऱ्याचे पाणी आटत नाही, तर पावसाळ्यात या झऱ्याचे पाणी ओढ्यातही जात नाही. त्यावेळी याच पाण्यावर ९ खांडी भात पिकविले जात असे. ही जमीन गहिनीनाथांची म्हणून ओळखली जाते. याच जागेत एक रुद्राक्षाचे झाड आहे. या झाडावर नैसर्गिकरीत्या ॐ व शिवलिंग रुद्राक्षात तयार होतात; परंतु आजपर्यंत ते कोणीही पाहिलेले नाही. या जागेच्या संदर्भातील या गोष्टींची ब्रिटिशकालीन दप्तरामध्ये नोंद आहे. आडाळी व मोरगाव यांच्या त्रिकोणात हे स्थान आहे.

कालांतराने आज लोकांनी येथे मोठे मंदिर बांधले आहे. मात्र मूळ जागा अजूनही तशीच आहे. ज्यांना ज्यांना या ठिकाणी असे अनुभव आले त्यांनी त्याची पूर्तता किंवा सेवा म्हणून हजारो वस्तू या ठिकाणी देणगी म्हणून दिल्या आहेत. त्यामध्ये घंटांचे प्रथम स्थान आहे. हा म्हातारबाबाचा उत्सव मे महिन्याचा पहिला सोमवारी साजरा केला जातो. दरवर्षी या ठिकाणी सुमारे २०० सत्यनारायणाच्या पूजा होतात. यामध्ये सहा आसनी रिक्षाचालक-मालक संघटना, कट्टा कॉर्नर चालक-मालक संघटना यांच्यासह संपूर्ण बांदा पंचक्रोशीतीलच नव्हे शेजारी असणाऱ्या गोवा राज्यातूनही असंख्य भाविकांची गर्दी असते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

30 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

39 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

47 minutes ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago