ब्लाईंड स्पॉटचा घेतला शोध, १०० ठिकाणी बसविणार सीसीटीव्ही
पुणे : कोलकाता येथील शासकीय रुग्णालयात कनिष्ठ डॉक्टर तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्याच रुग्णालयात टोळक्याने तोडफोड करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची ससून रुग्णालयाने धास्ती घेतली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कठोर पावले उचलत तब्बल १०० ठिकाणी ‘तिसऱ्या डोळ्यां’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोलकात्यामधील धक्कादायक घटनेनंतर ससून सर्वोपचार रुग्णालय डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अलर्ट मोडवर आले आहे. रुग्णालय परिसर, मुख्य इमारत ते अकरा मजली इमारतीचा परिसर वसतिगृह अशा ठिकाणचे ब्लाईंड स्पॉट शोधून काढण्यात आले. यासाठी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. रुग्णालयातील ड्यूटी संपल्यावर परत हॉस्टेलवर जाताना महिला डॉक्टरांबरोबर महिला सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
ससून रुग्णालयात कार्यरत निवासी डॉक्टरांची दोन वसतिगृहांमध्ये निवासाची व्यवस्था आहे. ससूनपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या सँडविच हॉस्टेलमध्ये पीजीचे विद्यार्थी राहतात. येथे पहिल्या मजल्यावर मुले, दुसऱ्या मजल्यावर एका विंगमध्ये मुली आणि एका विंगमध्ये मुले आणि तिसऱ्या मजल्यावर मुलींची व्यवस्था आहे. तातडीची सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांची निवासाची सोय ससूनच्या मुख्य इमारतीतील लॅटरल हॉस्टेलमध्ये करण्यात आली आहे. हॉस्टेलमध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पुढील पाच-सहा दिवसांमध्ये आणखी १०० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. रुग्णालयात सध्या २१७ सुरक्षा कर्मचारी आहेत. त्यामध्ये अजून सुरक्षा रक्षक ९० ते ९५ वाढवण्यात येणार आहे.
कोलकात्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही कामबंद आंदोलन सुरू केल्यावर प्रशासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली. ब्लाईंड स्पॉट शोधून तेथे सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू झाले आहे. कॉलेज कॅम्पसच्या आतमध्ये सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. कँटीनच्या बाजूने जाणाऱ्या लिफ्टचा अॅक्सेस मर्यादित करण्यात आला आहे. – डॉ. कल्याणी टुंडम, निवासी डॉक्टर
बीजे मेडिकल कॉलेज तथा ससून रुग्णालय २३ एकर परिसरात आहे. रुग्णालयाच्या सर्व बाजूंनी एकूण सहा ते सात गेट असून, त्यापैकी काही गेट कायमचे बंद आहेत. काही ठिकाणी सीमाभिंत कमी उंचीची आहे. कोलकात्याच्या घटनेनंतर आता ससून रुग्णालय प्रशासनाकडूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. कमी उंचीच्या कंपाउंड वॉलवरून कोणी आत प्रवेश करू नये म्हणून या भिंतीची उंची वाढवण्याचा, गेटजवळ भिंत घालण्याचा विचार आहे. रुग्णालयाची जुनी इमारत ते नवीन इमारतीदरम्यानचे अंतर मोठे असल्याने येथे लाइट आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. – डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय