Sunday, March 16, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमहाराष्ट्रात २५ लाख लखपती दीदींचे उद्दिष्ट

महाराष्ट्रात २५ लाख लखपती दीदींचे उद्दिष्ट

गिरीश महाजन – मंत्री, ग्रामविकास व पर्यटन, महाराष्ट्र राज्य

जळगाव येथे रविवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील ‘लखपती दीदी सम्मेलन’ तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार आहे. या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील स्वयंसहाय्यता गटांना २५०० कोटी रुपयांचा फिरता निधी व ५००० कोटी रुपयांचे बँक अर्थसहाय्याचे वितरण या कार्यक्रमात होणार आहे. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत हा कार्यक्रम होणार आहे, त्यानिमित्ताने हा लेख…

उमेद-अर्थातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करून देणारे, तसेच नवे क्षितिज नवा विश्वास निर्माण करून देणारे ग्रामीण महिलांच्या हक्काचे व्यासपीठ होय !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या ध्येयाकडे एक पाऊल म्हणून महाराष्ट्रात २५ लाख लखपती दीदी तयार करण्याचे कार्य पूर्णत्वास जात आहे. लखपती दीदींचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपयांपेक्षा जास्त होण्यासाठी त्यांना दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यवसाय संधी निर्माण करून दिली जाणार आहे. अभियानातील महिलांना बँकेचे व्यवहार शिकविले जातात त्यांना आर्थिक साक्षर केले जाते. कृषीविषयक माहितीसाठी अभियानात कृषी सखी आहेत, बँकविषयक मदतीसाठी बँक सखी, अशा विविध क्षेत्रांत प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती अभियानात आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्धीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. उमेद अभियानात २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण ८ हजार ९७४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून आजपर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात मोठे कर्ज म्हणून देखील गणले गेले आहे.

ग्रामीण भारतातील गरिबीच्या निर्मूलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये केली. अभियानामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब व जोखीम प्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक, लोकशाही तत्त्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करून त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा, तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी उमेदमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.

उमेद अभियानाच्या या महिला सक्षमीकरणाच्या चळवळीमध्ये आज महाराष्ट्रातील ३४ जिल्हे, ३५१ तालुक्यातील जवळपास ६६ लाख कुटुंब सहभागी आहेत. अभियानात आतापर्यंत ६ लाख ४० हजार महिला स्वयं सहाय्यता समूह स्थापन झालेले आहेत. यातील १ लाख २५ हजारांपेक्षा जास्त गट हे मागील दोन वर्षांत स्थापन झालेले आहेत. ३१,८१२ ग्रामसंघ, १,८७५ प्रभागसंघ, १० हजार ८३ उत्पादक गट आणि ४१० पेक्षाही जास्त शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झालेल्या आहेत. या संस्थांच्या दैनंदिन सुलभीकरणासाठी गावस्तरावर प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्तींची फळी निर्माण करण्यात आलेली आहे

उमेद अभियानमार्फत महिलांनी रोजगार कसा करावा? कोणता करावा? याचे प्रशिक्षण आरसेटी मधून आणि कृषी विज्ञान केंद्र व यासारख्याच विविध तज्ज्ञ संस्थामार्फत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी ग्रामस्तरापासून राज्यस्तरापर्यंत प्रशिक्षण कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. आरएसईटीआयचे प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे कौशल्य वाढविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. राज्यात १३ लाखपेक्षा अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत.

व्यवसाय वृद्धीसाठी उमेद अभियानामार्फत विविध प्रकारचे प्रदर्शनी स्थानिक पातळीवर भरवून उद्योगांना हक्काची बाजारपेठ तयार करून दिली जाते. तसेच विविध स्तरावर महालक्ष्मी सरस सारखे प्रदर्शन भरवून ग्रामीण महिलांच्या उद्योगांना जागतिक बाजारपेठ निर्माण करून दिली जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण महिलांची उत्पादने ग्राहकांना आपल्या घरापर्यंत उपलब्ध व्हावीत यासाठी umedmart.com हे ई-कॉमर्स पोर्टल सुद्धा सुरू करण्यात आले आहे.

उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची चळवळ आता जोर धरत आहे आणि हे बदल दृश्य स्वरूपात दिसत आहेत. ज्या ग्रामीण भागातील महिला केवळ घर, चूल, मूल यापुरत्या मर्यादित होत्या अशा असंख्य महिला आज अनेक मोठ्या व्यासपीठावर बेधडकपणे आपली मते मांडताना दिसत आहेत. तसेच अनेक महिला या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहून गावाच्या आर्थिक विकासात सुद्धा योगदान देताना दिसत आहेत. डोंगराळ भाग असो, की, अतिदुर्गम भाग अशा प्रत्येक ठिकाणी आज उमेद अभियानाची महिला स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करत आहे.

उमेद अभियानाच्या महिला आता मसाले, पापड, लोणचे यांच्यासह अनेक खाद्य पदार्थाची निर्मिती करीत आहेत. याशिवाय हस्तकला, कपडे, शोभेच्या वस्तू, शिल्पकलेच्या वस्तू, खेळणी, मातीची भांडी यांसारखे अनेक उत्पादने महिला घेत आहेत. राज्यात आजघडीला ग्रामीण महिलांचे शेती आधारित ३८ लाखांपेक्षा जास्त उद्योग व्यवसाय सुरू आहेत आणि बिगर कृषी आधारित सुद्धा ७ लाख ५६ हजार व्यवसाय सुरू आहेत. येणाऱ्या काळात आमच्या ग्रामीण भागातील महिलाच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असणार आहेत.

प्रत्येक गावातील कुटंबाचा सर्वांगीण विकास साधावा त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलनासाठी शासन अनेक योजना राबवत आहे. यासाठी ग्रामीण भागाची प्रगती दारिद्र्य निर्मूलानातून झाल्याशिवाय अशक्य असल्याचे लक्षात आल्यामुळेच केंद्र सरकारने देशभर दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण अजिविका मिशन हा ध्वजांकित कार्यक्रम सुरू केलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविला जात आहे. उमेद अभियान नावाने गावागावांत या कार्यक्रमाची ओळख आहे. या अभियानाने व्यापक चळवळीचे स्वरूप धारण केलेले आहे. प्रगतीचा आणि स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून, रोजगार अन् स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा शोधून उत्तुंग भरारी घेण्यासाठी ग्रामीण महिला सुद्धा क्षेत्रात अग्रेसर दिसत आहेत. महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण महिलांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि नवचैतन्य असण्यामागचे मुख्य कारण उमेद अभियान बनले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -