Thursday, March 20, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सशीतलीचा गुडलक

शीतलीचा गुडलक

टर्निग पॉइंट- युवराज अवसरमल

लागिर झालं जी’ नावाची एक मालिका होती. त्या मालिकेमध्ये शीतल नावाच्या ग्रामीण नायिकेची भूमिका साकारून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या गळ्याची ताईत बनलेली अभिनेत्री होती. प्रेक्षक तिला ग्रामीण अभिनेत्री मानू लागले होते. तिच्या अभिनयाला मिळालेली ती प्रेक्षकांची पावती होती. ती अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.

‘नेता गीता’ या चित्रपटात तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कॉलेजमधील राजकारण या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल.
माहिमच्या कनोसा हायस्कूलमधून तिचे शालेय शिक्षण झाले. शाळेतील गाण्याच्या व नृत्याच्या कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. माटुंग्याच्या डी.जी. रुपारेल कॉलेजमधून तिने पुढील शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना तिने आय. एन. टी. युथ फेस्टिवल, इप्टा यासारख्या स्पर्धेत भाग घेतला. कॉलेजमधून तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. सिनिअर मुलांना अभिनय करताना पाहून तिला देखील वाटायचे की, आपण देखील सहजपणे अभिनय करू शकू. तिची आई तिच्या काळात थिएटर करीत होत्या, भरतनाट्यम करायच्या. संस्कृत बॅले करायच्या. आईकडून नकळतपणे अभिनयाचे गुण शिवानीमध्ये उतरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तिला कॉलेजमध्ये थिएटर केल्याने अभिनयाच्या दृष्टीने खूप फायदा झाला. परंतु पुढे शिक्षण करण्यासाठी तिने थिएटर ग्रुप सोडला. शिक्षण पूर्ण केले.एका आय. टी. कंपनीत जर्मन एक्स्पर्ट म्हणून काम केले. सारे काही आलबेल सुरू होते. परत अभिनयाकडे कसे वळायचे हा मोठा यक्ष प्रश्न तिच्या पुढे उभा होता. मिरॅकल अकॅडेमीच्या प्रमोद प्रभुलकरकडे तिने ॲक्टिंग इन्स्टिट्यूट जॉईन केले. तिथे तिला खूप चांगले मार्गदर्शन लाभले. नंतर तिच्या जीवनात एका मालिकेच्या रुपात टर्निंग पॉइंट आला व ती मालिका होती, ‘लागिर झालं जी’. त्या मालिकेमध्ये तिची शीतल नावाची व्यक्तिरेखा होती. ती नायिका असते व नायकाला मिलीटरीच्या परीक्षेला जाण्यासाठी ती गूडलक देते. ही बाब प्रेक्षकांना खूप आवडली. त्यावेळी आणि आताही मिलिटरीच्या परीक्षेला बसणारी मंडळी तिचा गूडलक मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. आजदेखील तिला त्यासाठी पत्र येतात व ती देखील मोठ्या तत्परतेने त्या पत्रात गूडलक देते. या मालिकेनंतर तिला त्या प्रकारच्या भरपूर भूमिका आल्या होत्या.

‘नेता गीता’ हा तिचा चित्रपट आहे. त्यामध्ये श्रुती नावाची व्यक्तिरेखा ती साकारत आहे. ती खूप शिकलेली आहे. भगवद्गीतेमध्ये तिला रस असतो. सरळ वाटेने जाणारी असते. कॉलेजमध्ये इतर मुलीसारखी ती नाही, ती शांत, समंजस, विचारवंत अशा स्वभावाची आहे. या चित्रपटामुळे नवीन लोकांची ओळख होते, त्यांच्याकडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळते व आपल्याकडून देखील काही इतरांना शिकायला मिळते असे ती मानते. या चित्रपटामध्ये कॉलेजमध्ये घडणारं राजकारण पहायला मिळेल. काही जणांना राजकारणात सत्तेसाठी आपण काय करतो हे कळत नाही, त्यांच्याकडून काही चूका होतात, काय बरोबर काय चूक हे त्यांना कळत नाही, त्यांना मार्गदर्शन करण्याचा छोटासा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.

सध्या तिची ‘साधी माणसं’ ही स्टार प्लस वाहिनीवर मालिका सुरू आहे. प्रेक्षकांना तिचा अभिनय खूप आवडतोय. अजून एका चित्रपटावर तिचे काम सुरू आहे. ‘नेता गीता’ चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पहावा अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. शिवानीला तिच्या ‘नेता गीता’ या चित्रपटासाठी, मालिकेसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -