खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली
पुणे : पुणेकरांसाठी (Pune) अत्यंत महत्वाची बातमी आहे. खडकवासला धरणातून (Khadakwasla dam) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील मुठा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढू लागली आहे. नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात साचले पाणी साचले आहे. नदीपात्रात असलेली वाहने काढण्याचे काम सुरु आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात २७ हजार ८४१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन मुठा कालवे विभागाच्या प्रशासनाने केले आहे.
पवना धरणातून ३५०० क्युसेक विसर्ग सुरू
मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण हे १०० टक्के इतके भरले आहे. त्यामुळे शहरवासियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून ३५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
पवना धरण सद्यस्थितीत १०० टक्के भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झालेली आहे. धरणात येणारा येवा विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४०० क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून त्यामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून आणखी वाढ करण्यात आला असून सध्या ३५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. नागरीकांनी नदी पात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस
पुण्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. नेमका शनिवार रविवार बघून संततधार सुरु झाल्याने नागरिकांची धांदल उडाल्याचे दिसून आले आहे. पुढील दोन तीन दिवस पुण्यात पाऊस होणार असल्याचे हवामान विभाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळी भारतीय हवामान विभागाने पुढील ३-४ तासांत अहमदनगर नांदेड पुणे व रायगड या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण असमान आहे. शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. पण आज मात्र दुपारीच तीन वाजता सरी कोसळल्या. श्रावण महिना सुरू असल्याने उन्ह-पावसाचा खेळ पुणेकरांना पहायला मिळत आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत पुणे शहरात चांगला पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील पावसामुळे सर्व धरणंही भरून गेली.
मात्र ऑगस्ट महिना सुरू झाला आणि पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पण पंधरा ऑगस्टनंतर मॉन्सून सक्रिय झाला आणि पुण्यात सायंकाळी जोरदार पाऊस होत आहे. खडकवासला धरणातून दुपारी १ वा. मुठा नदी पात्रात ६ हजार ४४६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो वाढवून दुपारी २ वा. मुठा नदी पात्रात ८ हजार ७३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारी ३ वा. मुठा नदी पात्रातून १२ हजार ९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.