Saturday, March 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबदलापूर प्रकरणी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ भाजपातर्फे आंदोलन

बदलापूर प्रकरणी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ भाजपातर्फे आंदोलन

मुंबई : बदलापूर घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महिला अत्याचार प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आदी नेत्यांनी यात सहभाग घेतला. बदलापुरात घडलेल्या दुर्दैवी घटनेतील पीडित कुटुंबीयांबद्दल यावेळी संवेदना व्यक्त करण्यात आल्या.

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात मुंबईतील मादाम कामा रोड येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मविआ नेत्यांचा निषेध करणारे फलक हाती घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांबद्दल देखील बोला, अशा आशयांचे फलक घेऊन उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले, विजय वडेटटीवार, अंबादास दानवे, जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यात आले.

या वेदनादायी प्रसंगात घाणेरडे राजकारण करत मविआचे नेते आत्ता संस्कृती विरुद्ध विकृती असा नारा देत आहेत. मात्र महिला सुरक्षा, महिला सन्मानाचा बुरखा कशाला पांघरताय असा परखड सवाल वाघ यांनी केला. मविआ सरकारने महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये न्याय देण्यासाठी काहीही केले नव्हते याची आठवण आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून करून दिली, असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषद गट नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात महाड मधील चवदार तळे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी दरेकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या कालावधीत राज्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या अनेक घटनांचा उल्लेख केला. आ. दरेकर म्हणाले की, दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मविआ सरकारने केला होता. संभाजी नगर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा युवा कॉंग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख याने महिलेवर लैंगिक अत्याचार केले तेव्हा साधा एफआयआरही दाखल केला गेला नाही. त्यावेळी आम्ही कधीच राजकारण केले नाही. २००४ ते २०१४ या दरम्यान युपीए सरकारच्या कार्यकाळात देशात झालेल्या महिला अत्याचाराच्या दुर्दैवी घटनांची लांबलचक यादी असताना मविआचे नेते आता मात्र निर्लज्जपणे बदलापूर घटनेमध्ये राजकीय पोळी भाजत आहेत असेही दरेकर यांनी नमूद केले. या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी, मंजुषा कुद्रुमुती, मंजुषा जोशी, निलेश देवगीरकर आदी सहभागी झाले होते. आ. प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सायन सर्कल येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -