पाचवा वेद- भालचंद्र कुबल
गणपती येण्याची चाहूल लागली की, वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांच्या घोषणा एकत्रितच सुरू होतात. साधारणपणे आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांनी हा सीजन सुरू होऊन चतुरंगच्या सवाई एकांकिका स्पर्धांनी याची सांगता होते. काही स्पर्धा पुढे-मागे होत असतात; परंतु आजवरच्या अनेक वर्षांच्या शेड्युलमध्ये दखल घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या स्पर्धा…! पाठोपाठ विविध विद्यापीठांचे युथ फेस्टिवल्स, उंबरठा, पुरुषोत्तम व फिरोदिया करंडक, मानाची बोलीभाषा, मृणालताई नाट्यकरंडक, मराठी विज्ञान परिषदेची विज्ञान एकांकिका, कल्पना एक आविष्कार अनेक अशा एकाहून एक सरस आणि विविधता असलेल्या एकांकिका स्पर्धांचा राबता मग वर्षभर सुरू असतो.
१५ वर्षांपूर्वीच्या आसपास मी मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल विभागाचा समन्वयक म्हणून कार्यरत असताना मटा सन्मान, झी गौरव अथवा सांस्कृतिक कलादर्पण सोहळ्याच्या धर्तीवर एकांकिकासाठी “पारंगत एकांकिका गौरव सोहळा” आयोजित केला होता. खरंतर पारंगत हे ब्रँडनेम ज्येष्ठ नाट्यलेखक व दिग्दर्शक सुहास कामत यांनी सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धांचे होते. परंतु ती स्पर्धा बंद पडल्यावर, व ते पुढे कायमस्वरुपी निदान हौशी रंगभूमीच्या इतिहासात नोंदले जावे याचा तो प्रयत्न होता. त्यासाठी त्या काळात अखिल महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक एकांकिका स्पर्धेचा डेटा गोळा करुन त्यातून नामांकने आणि पुरस्कार देण्याचा सोहळा मुंबई विद्यापीठ, अस्तित्व नाट्यसंस्था आणि छ. शिवाजी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने थाटामाटात पार पडला होता. पदार्पणातील नामांकने आणि त्यातही मिळालेला तुलनात्मक पुरस्कार, हौशी रंगकर्मींचे मनोबल किती वाढवणारा असतो याचा प्रत्यय मला त्यावेळी आला होता. या सोहळ्यात व्यावसायिक असूनही, हौशी रंगभूमीवर सातत्याने काम करणाऱ्या प्रकाश बुद्धीसागरांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन यथोचित सन्मानही करण्यात आला होता. आरंभशूर असलेल्या मराठी माणसाच्या स्वभावाप्रमाणे पुढे यात सातत्य राखले गेले नाही. परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम एकांकिका स्पर्धांचा अभ्यास या निमित्ताने मला करता आला.
त्यावेळच्या सर्वेक्षणानुसार प्रतिवर्षी सरासरी १५०/१६० एकांकिका स्पर्धा घेतल्या जात होत्या. त्यात जर त्या वर्षी निवडणूका असतील तर नेते आणि राजकिय पक्षांकडून अशा स्पर्धांचे आयोजन हमखास केले जाते. बौद्धीक विचारशक्ती सशक्त असलेल्या युवाशक्तीला अशा स्पर्धांमधून संघटित करण्याची स्ट्रॅटेजी खेळली जाते. शेवटी संधीच्या शोधात असलेला प्रत्येक हौशी नाट्यकर्मी या आमिषांना बळी पडतोच. प्रत्येकापुढे व्यावसायिकतेचे आव्हान आवासून उभे आहे. त्यातही एकांकिका हाच आपला पोर्टफोलिओ असतो, याचा साक्षात्कार जवळपास हौशी रंगभूमीवर प्रवेश करणाऱ्या प्रत्येकालाच झालाय. थोडक्यात एकांकिका संधी मिळण्यासाठी वापरला जाणारा डिव्हाईस किंवा रुढार्थाने “शिडी” म्हणायला हरकत नाही. परंतु या शिडीने एकांकिका नामक नाट्यप्रकारावर फार विचित्र परिणाम करुन ठेवलाय. एकतर साधारणपणे ज्या काळात म्हणजे ७०-८०-९० या तीन दशकांत भरभराटीस आलेला हा नाट्यप्रकार कधीही नटाधिष्ठीत नव्हता. कथावस्तू व फॉर्म या सादरीकरणाच्या मुलभूत अंगाचा लेखन आणि दिग्दर्शनाचा प्रकर्षाने विचार व्हायचा.
अभिनयाचा विचार या दोन गोष्टींवर अवलंबून असायचा, मात्र आताच्या एकांकिका या बाबींचा विचार करत नाहीत. हा माझा नाही तर अशा स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून नेमल्या जाणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीचा आरोप आहे. चटकदार कंटेंट म्हणजे एकांकिका आणि त्याला सिनेमॅटीक रूप दिले की, उत्तम सादरीकरण हे गृहितक रुजू लागले आहे. रंगभूमीच्या वाढीस लागलेली ही किड आहे. नव्या आणि हौशी रंगकर्मींवर मालिका आणि चित्रपटांचा एवढा जबरदस्त इंम्पॅक्ट आहे की, कुणीतरी या स्पर्धा नाट्यशाळा म्हणून ट्रीट करण्याची गरज भासू लागली. मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घेतली जाणारी शिबीरे केवळ नाटक शिकवणारी असू नयेत. ती नाटक नावाचे माध्यम नेमके काय सांगते? हे शिकवणारी ती असावीत. अन्यथा त्यावर एकांकिका स्पर्धा हा त्यावरचा महत्त्वाचा उपाय असू शकतो.
यंदाच्या स्पर्धा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरीवली शाखेच्या “सुवर्णकलश” या एकांकिका स्पर्धेने सुरू होत आहे. मे महिन्याच्या सुट्टीत नाटकाचे प्रशिक्षण घेतलेले नवनाट्यकर्मी अशा स्पर्धांमधून दिसू लागतील. अनेक नाट्यप्रशिक्षक उदयाला येणारे नवे नाट्यकर्मी घडवण्याच्या प्रक्रियेला लागलेत, फक्त नव्या पिढीने त्यांच्याकडून नाटक हे माध्यम आत्मसात करावे ही एकमेव अपेक्षा.