नाशिक : गृहमंत्री आणि पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात. थँक्स लेस हा जॉब आहे, त्यांना अवार्ड मिळत नाही. पोलिसांमध्येही माणूस आहे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. नाशिक पोलिसांनी सकारात्मक बदल घडवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था आहे हे पोलिसांनी दाखवले. स्टार्सचे स्वागत आणि सत्कार करण्याचे भाग्य लाभले याचा मोठा आनंद झाला, हा अभिमानाचा क्षण आहे अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते नाशिकमध्ये बोलत होते.
महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक युनिटमध्ये ‘दामिनी पथक’ सुरु केले आहे. वेगवेगळ्या अॅप्स आणि नंबरच्या मदतीने महिलांना या सेवा तात्काळ पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शाळांमध्ये पोलीस दीदी ‘गुड टच बॅड टच’चे मुलींना प्रशिक्षण देत आहेत. तसेच ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून त्रासित महिलांना मदत केली जात आहे, अशी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली.
पोलिसांचे जीवन अतिशय चॅलेंजिंग जॉब झाला आहे. पूर्वी कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापराव्या लागत होत्या. व्हाईट कॉलर क्राईम व्हायला लागल्या आहेत. जमीन, ड्रग्स असं विषय आता आले आहेत. देशातील १०० वर्षे जुने ब्रिटिशकालीन कायदे होते. मात्र, मोदी आणि अमित शाह यांनी कायदे बदलले, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
या सुधारित नवीन कायद्याला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे. परंतु, त्याचा चुकीचा वापर करून अनेक गुन्हे घडत आहेत. वाढलेल्या आर्थिक गुन्ह्यांना जलद गतीने रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने एक ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार करून सर्व सोशल मीडिया कंपन्या आणि बँकांना एकत्रित आणले आहे. या प्लॅटफॉर्मचे काम सध्या प्रगतीपथावर सुरु असून कोणताही आर्थिक गुन्हा झाल्यास तो तात्काळ डिटेक्ट होईल, अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांचा प्रभावी तपास करण्यासाठी आणि फॉरेन्सिक कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ‘फॉरेन्सिक व्हॅन्स’ पोलीस आयुक्तालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.
ड्रग्जचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने केंद्र सरकारने याविरुद्ध ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ सुरु केली आहे. तसेच ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महिलांवरील गुन्हे हे अतिशय संवेदनशीलपणे हाताळले जावेत, अशी माझी पोलिसांकडून अपेक्षा आहे. समाजाने वाढत्या विकृतींकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे. तसंच, आपल्या मुलांना महिलांविषयी आदर आणि सन्मान शिकवणं व तो जागृत करणं गरजेचं आहे. ही भावना वाढीस लावली तर आणि तरच आपण वाढत्या विकृतींना आळा घालू शकतो. या कार्यक्रमात सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे, राहुल ढिकले, राहुल आहेर, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.