Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्समौनातला संवाद आणि शांततेचा आवाज...!

मौनातला संवाद आणि शांततेचा आवाज…!

राजरंग- राज चिंचणकर

अनेक नाट्यकृती, चित्रपट व मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका रंगवत अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिने स्वतःचा ठसा उमटवला आहे. काही वर्षांपूर्वी शीतलने ‘एक होती वादी’ या चित्रपटात काम केले होते. विशेष म्हणजे, एका कर्णबधिर मुलीची भूमिका तिला यात साकारायची होती. अर्थात, त्यासाठी अभ्यास हा आलाच. त्यासाठी शीतल कर्णबधिर व्यक्तींच्या एका ग्रुपला भेटायला शिवाजी पार्कात गेली.

शिवाजी पार्क जिमखान्याच्या मागे असलेल्या हिरवळीवर तिची या ग्रुपशी भेट झाली. या कर्णबधिर मंडळींनी सांगितलेले; तसेच शीतलने बोललेले एकमेकांना समजावे आणि त्यांच्याशी नीट संवाद साधता यावा म्हणून तिने सोबत डायरी व पेन ठेवले होते. त्यांच्याशी भेट झाल्यावर शीतलने डायरीत लिहिलेली स्वतः विषयीची माहिती त्यांना वाचायला दिली. एका चित्रपटातल्या भूमिकेसाठी ती त्यांना भेटायला आल्याचा त्यांना खूप आनंद झाला होता.

शीतल त्यांच्याशी बोलत असतानाच त्यांच्या संवादाच्या खुणाही शिकून घेत होती. त्यांचा मौनातला हा संवाद बराच वेळ सुरू होता. या संवादाबद्दल बोलताना शीतल सांगते, “आम्ही बोलत असताना सोबत प्रचंड शांतता होती. माझ्यासाठी हे सर्व फार वेगळे होते. संवाद साधत असताना मला खूप ताण जाणवत होता. त्यावेळी मला काही ऐकू येत नव्हते; पण माझे डोळे आणि माझी त्वचा ‘ऐकण्याचे’ काम करत होती. आपल्या एखाद्या इंद्रियाकडून अपेक्षित असलेले कार्य होऊ शकत नसले तर, इतर इंद्रिये ती उणीव कशी भरून काढतात; याची मला त्यावेळी जाणीव होत राहिली. माझ्या भूमिकेच्या निमित्ताने मी त्या मंडळींना भेटले; पण त्या भेटीपासून माणसांना समजून घेण्याचा माझा ‘पेशन्स’ खूप वाढला. त्या संध्याकाळी मी प्रचंड नि:शब्द अशी शांतता अनुभवली आणि शांततेचा आवाज काय असतो, याची जाणीवही मला त्या दिवशी प्रकर्षाने झाली. त्या शांततेने मला माझ्या भूमिकेचा आवाज मिळवून दिला.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -