मेघना साने
आम्ही दहा-बारा मंडळी आपल्या तरुण मुलांना घेऊन गोविंद साठे यांच्याकडे गेलो होतो. साठे हॉलमध्ये बैठक मांडून बसले होते. एका मागे एक रेकॉर्ड्स (ध्वनिमुद्रिका )ग्रामोफोनवर लावत होते आणि त्या गाण्यांची माहिती अतिशय सुंदर प्रसंग रंगवून सांगत होते. आमच्या मुलांनी काय, आम्ही सुद्धा ग्रामोफोन कधी पाहिला नव्हता. रेकॉर्डवरून स्वच्छ सुंदर आवाजात गाणी ऐकण्याचा आनंद काही औरच होता. सध्याच्या मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या जगात, एका क्लीकवर गाणी मिळत आहेत. मात्र साठे यांच्याकडे ऐकलेली गाणी कोठेही सहज उपलब्ध नाहीत. त्यांनी गेल्या चाळीस वर्षांच्या भटकंतीतून ती जमवलेली आहेत.
हिंदी, मराठी, गुजराती अशा अनेक भाषांतील तसेच सुगम संगीत, चित्रपट गीत आणि क्लासिकलचा वैविध्यपूर्ण खजिना! एक हजार रेकॉर्ड्स साठे यांनी गोळा करुन कपाटात नीट जतन करून ठेवल्या आहेत. हा एक रेकॉर्डच असावा. स्वतः त्याचा आनंद घेतात आणि इतरांना आमंत्रित करून मैफल रंगवतात. त्यांच्या पत्नी सुचित्रा साठे पाहुण्यांचे योग्य आदरातिथ्य करून, कार्यक्रम अधिक गोड करतात. सुचित्रा साठे स्वतः लेखिका आहेत. त्यांचे लेख अनेक वर्षे आपण वाचत असतोच. साठे दाम्पत्यांच्या रेकॉर्डच्या उपक्रमामुळे अनेक परिवार त्यांच्याशी जोडले गेलेत.
गोविंद साठे हे विद्यार्थीदशेत बडोद्याला होते. कॉलेजला जाताना एखादे गोड हिंदी गाणे सिलोन किंवा विविध भारतीवरून ऐकायला मिळाले, तर सायकल थांबवून त्या घराजवळ जाऊन ते ऐकत. पुढे मुंबईला आल्यावर मराठी गाणी ऐकू येऊ लागली. त्यांच्या एका मित्राने त्यांना ग्रामोफोन दाखवला आणि त्यावर रेकॉर्ड कशी वाजते ते दाखवले. साठे हरखून गेले. कारण नेहमीच्या रेडिओच्या गाण्यापेक्षा अतिशय सुस्पष्ट आणि मनाला सुखावेल असा आवाज होता. असा ग्रामोफोन आपण मिळवायचाच असे त्यांनी ठरवले.
दुकानात जाऊन त्याची किंमत विचारून ठेवली. किंमत होती पाचशे सत्तर रुपये! १९७५ साली त्यांना ती किंमत फार मोठी वाटली. पण तरीही रेकॉर्ड प्लेयर खरेदी करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुंबईच्या बँकेत नोकरी लागल्यावर त्यांनी मोहम्मद अली रोडवर फेऱ्या मारून तेथे जाऊन आपल्या आवडीच्या ध्वनिमुद्रिका विकत घ्यायला सुरुवात केली खरी, पण ग्रामोफोन आणल्याशिवाय त्या ऐकणार कशा? एकदा पैसे जमले आहेत असे पाहून त्यांनी दुकानदाराकडे धाव घेतली. गोखले रोडवरील एका दुकानात एकुलता एक पीस शिल्लक होता तो मिळवला आणि घरी आले. त्यावर आपल्याला आवडलेली पहिली रेकॉर्ड लावली. लता मंगेशकर यांच्या आवाजातले ते गीत होते ‘संत बहिणाबाई’ चित्रपटातील.
रेकॉर्ड प्लेअर चालतो आहे याची खात्री करून मग रेकॉर्ड जमवणे सुरू केले. कधी एखादे गाणे ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर ऐकले, गोड वाटले, तर ते बाजारात जाऊन शोधायचे. मग त्यासाठी कितीही फेऱ्या लागू देत. ते आणल्याशिवाय राहायचे नाहीत. साठे यांच्याकडे १९३२ ते १९६९ या संगीताच्या सुवर्णकाळातील अनेक रेकॉर्ड्स आहेत. जुन्या गायकांची नाट्यगीते, भावगीते, चित्रपट गीते तर आहेतच शिवाय काही चित्रपट तारकांनी गायलेली मराठी गीते आहेत. स्नेहप्रभा प्रधान यांच्या स्वरातले एक गीत आहे. तर लता मंगेशकर यांनी गायलेली ‘एरी आई पिया बिन’ ही यमनमधील चीज आहे. तसेच लता मंगेशकर आणि खुद्द दिलीपकुमार यांच्या आवाजातले युगुलगीत आहे. तसेच त्या काळी गाजलेल्या विश्वास काळे, बबनराव नवडीकर, हिराबाई बडोदेकर, सुलोचना चव्हाण, गजानन वाटवे, जी. एन. जोशी यांनी गायलेल्या अनेक रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आहेत. एकदा एका संस्थेसाठी हिराबाई बडोदेकर यांच्यावर गोविंद साठे यांनी रेकॉर्डसहित चक्क तीन तासांचा कार्यक्रम सादर केला होता.
गोविंद साठे यांच्या रेकॉर्ड्सची कीर्ती दूरवर पसरली. अनेक गायक मंडळी, नाट्यअभिनेते घरी येऊन संगीत ऐकायचे. एकदा गोविंद साठे बँकेत काम करत असताना तेथील लँडलाईन नंबरवर फोन आला. कोणीतरी सांगितले, ‘’साठे, अहो बाबुजींचा फोन आहे.” साठे यांचा विश्वासच बसेना. पण खऱ्याखुऱ्या सुधीर फडके यांचा फोन होता. सुधीर फडके यांनी गोविंद साठे यांच्याशी संवाद करून त्यांच्या घरी रेकॉर्ड ऐकायला येण्याची इच्छा व्यक्त केली.
गोविंद साठे अतिशय आनंदित झाले. सकाळी नऊ वाजता साठे यांचेकडे आलेले बाबूजी, रेकॉर्ड्स ऐकत चक्क रात्री साडेआठपर्यंत रमले. साठे यांच्याकडे ललिता देऊळगावकर यांची म्हणजे सुधीर फडके यांची पत्नी, त्यांच्यासुद्धा रेकॉर्ड्स होत्या. त्याही त्यांनी तन्मयतेने ऐकल्या आणि स्वतःची गाणी पुन्हा कान देऊन ऐकली. साठे यांनी जमवलेल्या विविध गाण्यांच्या रेकॉर्ड ऐकून ते प्रफुल्लित झाले. १९८७ च्या सुमारास गोविंद साठे यांनी आपल्या काही मित्रांसह ठाण्यात ‘इंद्रधनू’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होऊ लागले. ठाण्यातला रसिकवर्ग जोपासला जाऊ लागला. अनेक दिग्गजांच्या मुलाखती आयोजित होत होत्या. एकदा चक्क पं. हृदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत आयोजित करण्यासाठी गोविंद साठे आपल्या कार्यकारणी समवेत ‘प्रभात’ वर गेले. तेथे लतादीदींची ही भेट झाली.
इंद्रधनुच्या कार्यक्रमांमुळे साठे यांच्याकडे कलाकार मंडळींची ये-जा वाढली. बैठकी होऊ लागल्या. एकदा तर संगीतकार यशवंत देव गाणी ऐकायला त्यांच्या भाच्यासमवेत साठे यांच्याकडे आले. साठे यांना देवच पावल्यासारखे वाटले. देवसाहेब स्वतः चाल दिलेली गाणी अगदी लक्षपूर्वक ऐकत बसले. संगीतकारांची प्रतिभा नेहमी जागृत असते याचा साठे यांना प्रत्यय आला. लता मंगेशकर यांनी गायलेले अतिशय प्रसिद्ध गीत ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणं ऐकताना यशवंत देवांना त्याक्षणी सुद्धा काही ओळींसाठी वेगळी चाल सुचली.
२००० साली साठे यांनी आपल्या बँकेतील नोकरी सोडली. स्वेच्छानिवृत्ती घेऊन वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. ठाण्यातील ज्येष्ठ योगगुरू अण्णा व्यवहारे यांचे शिष्य म्हणून त्यांनी योगवर्गांना मार्गदर्शन केले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बारा वर्षे योग वर्ग चालवला. ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये काही वर्ष योग शिकवला. अतिशय निष्णात आणि शिस्तप्रिय योग मार्गदर्शक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. साठे यांचे पाचपाखाडीतील घरी आजही लोक दुर्मिळ रेकॉर्ड्स ऐकायला येतात आणि गोविंद साठे यांच्या विवेचनासह ती गाणी ऐकून तृप्त होऊन जातात.