काठमांडू : महाराष्ट्रामधील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे.नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जात असलेल्या बसला भीषण अपघात झाला असून, या अपघातामध्ये राज्यामधील १४ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबतची धक्कादायक माहिती आता समोर आली असून, बसमधून जे प्रवास करत असलेले भाविक हे महाराष्ट्रातील असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सुमारे ४० भाविकांना घेऊन पोखरा येथून काठमांडूला जात असताना या बसचा अपघात झाला आणि ती नदीत कोसळली.
याबद्धलच्या मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक हे नेपाळमध्ये तीर्थयात्रेला गेले होते. प्रयागराज येथून तीन बसमधून हे प्रवासी नेपाळमध्ये गेले होते. हे प्रवासी भुसावळ आणि आसपासच्या भागाती असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या तीन बसपैकी एक बस घसरून अपघातग्रस्त झााली आणि पृथ्वीराज मार्गावरील दमौली मुगलिंग रोड खंड मार्स्यांगदी नदीमध्ये कोसळली. मुसळधार पाऊस असल्यामुळे नदीला पूर आलेला असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. तसेच अपघातग्रस्त बसमधील काही प्रवासी हे वाहून गेले असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
याबद्धल राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, साधारणत: तासाभरापूर्वीच या अपघाताबाबत मला माहिती मिळाली आहे. याबाबत मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जळगावमधील जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी आणि या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी नेपाळच्या दुतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या रिलिफ कमिश्नरशी संपर्क करून नेपाळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या बसमधील भाविकांच्या आणि इतर पर्यटकांच्या मदतीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
याबाबत नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा क्रमांक UP FT 7623 असा आहे. ही बस नेपाळमधील पोखरा येथून काठमांडूला जात असताना नदीत पडली. सकाळी ११. ३० च्या सुमारास हा अपघात झाला. बस नदीत कोसळल्याच तिथून जाणाऱ्या लोकांनी पाहिले आणि पोलिसांना कळवले. ही बस उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील धरमशाला मार्केटमधील सौरभ केसरवानी यांच्या पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.