मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे २९ ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा करण्यात येणार होती, पण त्यांनी आपला निर्णय पुढे ढककला आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपण लढा उभारणार असल्याची घोषणा करत, मनोज जरांगे यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचे म्हटले आहे.
आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने बैठका घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं आहे. मतदार संघानिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं. लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते, आता सरकार कसे कर्जमाफी करत नाहीत हे पाहतो, असेही जरांगे यांनी म्हटले.
निवडणुका आल्या की साड्या वाटतात, आताही यांचं तसंच सुरु झालं आहे. सगळे मुद्दे आम्ही ताकतीने लावून धरणार आहोत. त्यासाठी, ५ सप्टेंबर पासून विधानसभा मतदारसंघानिहाय घोंगडी बैठका होणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील ७०० ते ८०० इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. आम्हाला वाटतं होतं की मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील, पण सर्वात जास्त अर्ज पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. त्यानंतर नंबर २ ला मराठवाड्यातून आले. आम्ही त्यासाठी लोक बसवलेत. मला त्यातील जास्त काही जमत नाही’, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.