Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेदहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी आलेले मंडप परवानगी अर्ज विनाविलंब मंजूर करावे!

दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी आलेले मंडप परवानगी अर्ज विनाविलंब मंजूर करावे!

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे निर्देश

ठाणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गणेशोत्सव तयारीबाबत केलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी घेतला. या बैठकीत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दहीहंडी उत्सव (Dahihandi) आणि गणेशोत्सवसाठी (Ganeshotsav) ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आलेले मंडप परवानगीचे अर्ज सहायक आयुक्तांनी विनाविलंब मंजूर करावेत, असे निर्देश दिले आहेत.

सध्या दहीहंडीच्या मंडपासाठी ५१ तर गणेशोत्सवाच्या मंडपांसाठी १५७ अर्ज आले असून त्यांच्या परवानगीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मंडळांकडून परवानगीसाठी आलेले अर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल यांच्याकडील आवश्यक परवानगी, ना हरकत दाखला घेवून प्रभाग समिती स्तरावर तत्काळ मार्गी लावावेत. किती परवानगी देण्यात आली, त्यात काही विलंब होत नाही ना याचा सहायक आयुक्त आणि परिमंडळ आयुक्त यांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घ्यावा, असे अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी सांगितले.

त्याचबरोबर, विसर्जन घाट आणि परिसर तेथील व्यवस्था यांचीही माहिती या बैठकीत देण्यात आली. मंडळांनीही आवश्यक त्या सर्व परवानगी वेळेत घ्याव्यात. त्यापैकी मंडप परवानगी ही मंडळांच्या दर्शनी भागात लावावी. तसेच, वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यास मंडळांनी सक्रिय साथ द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यानिमित्ताने केले आहे.

महापालिकेच्या आरास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी दरवर्षी महापालिका आरास स्पर्धेचे आयोजन करते. त्यात एकूण आठ पारितोषिके दिली जातात. प्रथम क्रमांकास १० हजार, द्वितिय क्रमांकास ७५०० आणि तृतीय क्रमांकास ६५०० रुपये असे पारितोषिक असते. स्पर्धेतील सहभागासाठी ०२ सप्टेंबरपर्यंत मंडळांना माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करता येतील. या स्पर्धेचे परीक्षण त्रयस्थ परीक्षकांमार्फत केले जाते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -