मुंबई : बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र बंदच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते. यानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा लागतो. उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. मात्र, महाराष्ट्रभर आम्ही महाविकास आघाडीची सर्व नेते आणि कार्यकर्ते हातामध्ये काळे झेंडे घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही घडलेल्या घटनांचा निषेध करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून उद्या सकाळी ११ वाजता आंदोलन नाही मात्र निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र बसणार आहोत, असे नाना पटोलेंनी स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे, असे शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटले होते.
राज्यात काही लोकांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी एवढी घाई झाली आहे की, लोकांच्या दुःखातही त्यांना राजकीय संधी दिसत आहे. त्यामुळे अशी विकृती वेळीच ओळखली पाहिजे. लाडकी बहीण योजना रोखण्यासाठी देखील विरोधक कोर्टापर्यंत गेले होते. मात्र, तिथे देखील त्यांना न्यायालयाने फटकारलं. असाच प्रकार आज झाला असून महाराष्ट्र बंद करणाऱ्यांना कोर्टाने परत एकदा चपराक लावली आहे. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बदलापूर सारख्या घटना होऊ नये, पण त्याचे राजकारण होऊ नये. काही लोक मतासाठी मिंध्ये झालेत. आरोपीला फाशी देणार आहे. हा समाजाचा प्रश्न आहे, जो पर्यंत महिला मुलींना सन्मान देणार नाही, तो पर्यंत विकृत प्रवृत्ती राहतील. पण त्यांना आम्ही ठेचणार आहोत. महाराष्ट्र बंदची काही पक्ष घोषणा देत आहेत. २०२०-२१ साली ज्या घटना घडल्या, तेव्हा तुमचे सरकार होते. तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाहीत. कलकत्तामध्ये इतका निर्घृण प्रकार झाला तरी तुम्ही काही बोलले नाही. तुम्हाला निव्वळ राजकारण करायचे आहे. – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शरद पवार यांनी घेतला होता यू टर्न
खरंतर, महाविकास आघाडीच्या सहयोगी पक्षांकडून जाहीर करण्यात आलेल्या बंदला आव्हानावरून वकील आणि याचिककर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाला अपील केले होती की हा बंद बेकायदेशीर आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने आदेश दिला की कोणताही राजकीय पक्ष बंदचे आवाहन करू शकत नाही. जर असे कोणता पक्ष करत असेल तर राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी. या निर्णयानंतर शरद पवारांनी बंद मागे घेतला.
काळी पट्टी बांधून विरोध करणार विरोधी पक्ष
दरम्यान, २४ ऑगस्टला विरोधी पक्ष काळी पट्टी बांधत विरोध प्रदर्शन करतील. तर नागपूरमध्ये काँग्रेस आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार आणि नागपूर काँग्रेसचे नेते तोंडावर काळी पट्टी बांधून बदलापूर अत्याचार प्रकरणाचा विरोध दर्शवतील.