सध्या दररोज कोणत्या ना कोणत्या नवीन आजाराचे नाव आपल्याला माहिती पडत आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्लेगच्या साथीने महाराष्ट्रातील जनतेची विशेषत: पुणेकरांची झोप उडवली होती. त्या आजारांचा प्रभाव त्या त्या परिसरापुरता सीमित असायचा. पण सर्व जगाची झोप उडविण्याचा पराक्रम कोरोना या आजाराने केला. कोरोना जगाला उद्ध्वस्त करून गेला, होत्याचे नव्हते झाले. जगातील अनेक देशांचे अर्थकारण बिघडविले. जगाने एकत्रितपणे कोरोनाविरोधात लढा देत कोरोनावर विजय मिळविला. कोरोनाच्या धक्क्यातून जग आताच कुठे सावरायला लागले असतानाच आता मंकीपॉक्सने पाय पसरले. कोरोनासारखेच मंकीपॉक्सच्या व्याप्तीची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून जगावर लॉकडाऊनचे संकट पुन्हा निर्माण होतेय की काय याची कुजबुज वैद्यकीय विश्वात सुरू झाली. मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य पथकाला सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास त्याच्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
मंकीपॉक्स आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांत हा विषाणू आढळतो. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो. मंकीपॉक्स हा प्रामुख्याने थेट शारीरिक संपर्क, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे होणाऱ्या संसर्गाद्वारे होऊ शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. मंकीपॉक्स रुग्णाला मागील ३ आठवड्यांत मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करून राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा, घसा खवखवणे आणि खोकला अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे आवश्यक आहे. आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करावा. मंकीपॉक्स या आजाराविषयी जगभरात प्रशासनाच्या वतीने सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. यानुसार आरोग्य सेवा आयुक्त रंगा नायक यांनी विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन सर्व क्षेत्रीय आरोग्य उपसंचालक, महापालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना दिल्या आहेत. मंकीपॉक्स न होण्यासाठी
•संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे, रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरूण-पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.
• हातांची स्वच्छता ठेवणे.
• आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.
कोरोना भारतात दाखल झाल्यावरही विमानतळे बंद करणे, बाहेरील देशातून येणाऱ्यांना भारतात येण्यास मज्जाव करणे याबाबतीत आपणास काही प्रमाणात विलंब झाला होता आणि त्याचीच आपणास फार मोठी किंमत मोजावी लागली होती. त्यापासून धडा घेत भारताने मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनेनुसार केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध व उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये सर्व आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा सामावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षण, प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
कोरोना महामारीचा उद्रेक जागतिक पातळीवर झालेला असतानाच कोरोनावर तात्काळ उपाययोजना करण्यात जागतिक पातळीवर त्या त्या देशातील आरोग्य यंत्रणांना मर्यादा पडल्या होत्या. परंतु मंकीपॉक्सवर मात्र उपाययोजना करताना लसीकरणासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. आता या आजारावर स्वदेशी लसीचे काम सुरू कऱण्यात आले असून ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जात आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येत असल्याचे जाहीर केले. आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांना मंकीपॉक्सची लागण झाली. मंकीपॉक्सच्या विषाणूचा नवा प्रकार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या आजारावरील लसींचा पुरवठा कमी आहे. या परिस्थितीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. मंकीपॉक्समुळे धोक्यात आलेल्या लाखो लोकांसाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या आजारावरील लसीसंदर्भात काम करत आहे. वर्षभरात सकारात्मक निष्कर्ष हाती येण्याची आशा आहे. कोरोनाच्या अनुभवातून सावध झालेल्या आम्हा भारतीयांनी मंकीपॉक्सबाबत सरकारने व आरोग्य विभागाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे आवश्यक आहे.