कांदिवलीतील या भयंकर प्रकारात २३ वर्षीय आरोपीला अटक
मुंबई : बदलापूरच्या घटनेनंतर (Badlapur crime) राज्यभरात आंदोलन सुरु असताना आता एकामागून एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. राज्यात चिमुकल्यांवरील अत्याचाराचे संतापजनक सत्र सुरूच आहे. त्यातच आता मुंबईच्या कांदिवली परिसरातून (Kandivali crime) एक आणखी भयंकर घटना घडली आहे. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत एका शेजाऱ्यानेच अल्पवयीन दिव्यांग मुलीवर घरात घुसून अत्याचार केले. या प्रकरणी २३ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते, हीच संधी साधत शेजारच्या व्यक्तीने संधी साधत पीडितेच्या घरामध्ये जबरदस्ती प्रवेश केला. त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे मुलगी घाबरून गेली होती आणि काही दिवस काही बोलत नव्हती. तिच्या आईला शंका आली. आईने मुलीला धीर देऊन विचारणा केली असता त्यांच्या पायाखालील जमीन सरकली. पीडित मुलीने आईला घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.
पीडितेच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी केली २३ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग) आणि ३३३ (ट्रेसपासिंग) सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ८,१२ अंतर्गत अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईत महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.