ऊसाच्या शेतात सापडला मृतदेह
कोल्हापूर : राज्यात सध्या चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या अत्यंत भयानक घटना समोर येत आहेत. बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच कांदिवलीमध्येही अल्पवयीन अपंग मुलीवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली. यानंतर आता कोल्हापूरमधूनही एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात १० वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या मुलीचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील शिये गावातील राम नगर परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलगी बुधवार दुपारपासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांत काल सायंकाळी तक्रार दाखल केली होती. यानंतर आज पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने मुलीला शोधून काढले. शियेपासून काही अंतरावर असलेल्या शेतात या मुलीचा मृतदेह पडलेला सापडला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
आज गुरुवारी महायुतीचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे. १० वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश करण्यास सुरुवात केली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
वैद्यकीय तपासणीनंतर होणार खुलासा
दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलगी मूळची बिहारची असून, ती आपल्या आई-वडील आणि पाच भावंडाबरोबर रामनगर परिसरात राहत होती. मुलीचे आई-वडील शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात मजूर म्हणून कामाला जात होते. मुलीचा मृतदेह आता वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर याबाबत अधिकचा खुलासा करता येईल असे पोलिसांनी सांगितले.