बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. भावना काय असतात हे कळण्याआधी त्या चिमुरड्यांवर शाळेतील सफाई कामगारांनी केलेला लैंगिक शोषणाचा प्रकार हा वेदनादायी आणि मन सुन्न करणारा आहे. त्या चिमुरड्यांच्या पालकांनी पोलिसांत दाद मागण्यासाठी गेल्यानंतर जर विलंब झाला असेल तर हे संवेदनशील पोलीस दलाला शोभणारे नाही; परंतु नव्याने जी माहिती पोलिसांच्या माध्यमातून देण्यात येते ती अशी की, गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्या मुलींच्या मनावर परिणाम न होता, तिथे नेमके काय घडले हे पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पोक्सोसारखा कायदा अशा प्रकरणांमध्ये लागत असल्याने, त्या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता, वैद्यकीय तपासणीसाठी वेळ लागला होता. पोलिसांच्या बाजूने विचार केला तर या कायद्याच्या प्रक्रियेतील गोष्टींसाठी १० ते ११ तास लागले, असे खरे मानले तरीही, जी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या पालकांच्या मानसिकतेचा विचार स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी करायला हवा होता. त्यांना विश्वासात घेऊन कायद्याची प्रक्रिया पार पडली असती तर, शाळेच्या आवाराबाहेर एवढ्या मोठ्या संख्येने पालक एकत्र आले नसते. पोलिसांकडून न्याय मिळत नाही, शाळा व्यवस्थापन हे आरोपीला पाठीशी घालत आहे, ही भावना सार्वत्रिक झाल्याने, आंदोलन करण्याचा पवित्रा पालकांनी घेतला असावा, हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे संबंधित शाळेतील पालकांना दोष देणे हे योग्य नाही.
पोलिसांनी आरोपीला ताबडतोब अटक केली असती, तर कदाचित या दुर्दैवी घटनेचे रूपांतर तब्बल ११ तास रेले रोकोसारख्या घटनेत झाले नसते. माणुसकीला काळिमा लावणारी बदलापूरची घटना अशीच प्रतिक्रिया कोणाच्याही डोळ्यांसमोर उभी राहते. घटनेचे गांभीर्य ओळखून, पोलिसांनी सुरुवातीला बळाचा वापर केला नाही. जमावाचा इतका उद्रेक झाला होता की, बदलापूर रेल्वे स्थानकाच्या परिसरातून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीष महाजन हे जमावाला शांत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले; परंतु कायद्याला सोडून आंदोलक मागणी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ज्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला, त्यांची तडकाफडकी बदली करून चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच ज्या शिक्षण संस्थेत हा दुर्दैवी प्रकार घडला, त्या शाळेच्या व्यवस्थापकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी आंदोलकांच्या जमावाला सामोरे जात दिली. तरीही जमाव शांत झाला नाही. त्यामुळे या आंदोलकांना नेमके काय हवे आहे याची कल्पना येत नव्हती.
आताच्या आता आरोपीला फाशी द्या, या मागणीचा हट्ठ काही आंदोलकांकडून करण्यात आला. जे कायद्याच्या राज्यात शक्य नाही, याची कल्पना आंदोलकांना असावी. त्यामुळे आंदोलन पेटते ठेवण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींकडून झाला. शाळेच्या आवाराबाहेर जमलेल्या पालकांमध्ये स्थानिक नागरिक होते; परंतु बदलापूर रेल्वे स्थानकावर अचानक जमलेल्या हजारो जमावांमध्ये स्थानिक कमी तर बदलापूरच्या बाहेरच्या मंडळींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, असा आरोप स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केला. आता आरोपातील काही पैलू हळूहळू बाहेर पडत आहेत. शाळा ही बदलापूर रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे काही आंदोलकांना रेल्वे स्थानकांत ठिय्या मारून बसा असे आदेश कुणी दिले हे आता तपासाचा भाग होऊ शकतो. रेल्वे स्थानकात आरोपीला फाशी द्या ही मागणी आपण समजू शकतो; परंतु लाडकी बहीण योजना बंद करा, असे पोस्टर बॅनर्स या ठिकाणी कसे आले याचाही विचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात जो उदंड प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे विरोधकांना आधीपासून पोटशूळ आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेच्या आडून राज्यातील गरीब महिलांना लाभदायक ठरणारी योजना कशी बंद पडेल याचा डाव तर कुणी आखत नसेल ना? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत, आंदोलनाच्या पडद्यामागून कुणी तरी तर मारत नाही ना? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.
या घटनेनंतर उबाठाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून काल रात्रीपासून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईतील माजी महापौर आणि उबाठाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही मंगळवारी बदलापूर येथे धाव घेतली होती. बदलापूर शांत असताना, उबाठाच्या दुसऱ्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. महिला पत्रकाराला अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत बदलापूरमध्ये आंदोलन करणार असा इशारा अंधारे यांनी दिला आहे. त्यामुळे मूळ प्रकरण शांत होत असताना बदलापूर विभागात कसा तणाव राहील याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत असावा, असा संशय येण्यास वाव आहे. आता याच बदलापूर प्रकरणाचा धागा पकडून महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लाडकी बहीण योजनेला शह देण्यासाठी सुरक्षेच्या नावाखाली राज्यातील महिलांना संभ्रमात टाकण्याचे काम विरोधक करत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये.